मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान आपण पंतप्रधानांची बोलून त्यांना पदमुक्त करण्याची विनंती केली असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यपालांचे पंतप्रधानांना पत्र : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे आपल्याला महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पदमुक्त करावे, अशी विनंती केली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या विविध विकास कामांमध्ये आपल्याला भाग घेण्याची संधी मिळाली. तसेच महाराष्ट्राच्या सारख्या ऐतिहासिक आणि वैभवशाली महापुरुषांच्या भूमित काम करायची संधी मिळाली, याबाबत त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. यापुढील काळात आपल्याला चिंतन, मनन आणि अभ्यास करावयाचा आहे, त्यासाठी राजकीय जबाबदारीतून पदमुक्त करा, अशी विनंती त्यांनी पत्रात नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
पंतप्रधानांकडेच केली विनंती : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याचे जाहीर केल्यानंतर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी यावर मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, वास्तविक राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताना किंवा विनंती करताना तसे राष्ट्रपतींना कळवणे अपेक्षित आहे. मात्र, राज्यपाल हे पद जरी संविधानिक असले तरी त्यांची नियुक्ती ही राजकीय असते. त्यामुळे पक्षाचे राजकीय प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे कोश्यारी यांनी विनंती केली असावी.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादग्रस्त : जोशी पुढे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोरोना काळात जनतेला दिलासा देण्याचे काम केले. त्यांनी जनतेसाठी राजभवनाचे दरवाजे खुले केले. मात्र त्यानंतर अनेक वादग्रस्त विधानांमुळे ते अडचणीत आले यामुळे आधी सत्ताधाऱ्यांच्या टारगेटवर ते राहिले. तर आता स्वपक्षासाठी ते अडचण ठरू लागले आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांच्या वक्तव्याचा विरोधकांकडून वापर केला जाऊ शकतो.
राजकीय घटनांची पार्श्वभूमी : हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांच्यावतीने त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात मोठा मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र त्यानंतरही राज्यपालांना पदावरून हटवण्यात आले नव्हते. अखेरीस राज्यपालांनी आता स्वतःच या पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी त्याला अनेक बाबींची आणि राजकीय घटनांची पार्श्वभूमी आहे, असेही मत जोशी यांनी व्यक्त केले. तर राज्यपाल यांचा कार्यकाल ही संपत आला असून त्यांना पदमुक्त करण्याची ही गरज कदाचित भासणार नाही, असेही जोशी म्हणाले.
हेही वाचा : Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अन् वादग्रस्त वक्तव्य; वाचा सविस्तर