मुंबई - राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पोलिसांच्या मनोबलावर परिणाम होईल, असे काहीजण म्हणतात. मात्र, कठीण काळात पोलिसांची कार्यक्षमता दुप्पट झाली आहे. या लढाईत ते एकटे नसून सरकार त्यांच्याबरोबर आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेले एएसआय सुनील दत्तात्रय कलगुटकर यांना श्रद्धांजली वाहिली.
26/11 चा दहशतवादी हल्ला आणि मुंबईला बुडवणारा २००५ चा महापूर, यावर देशमुखांनी प्रकाश टाकला. महाराष्ट्र पोलीस नेहमीच जीव धोक्यात घालून नागरिकांना मदत करण्यासाठी हातभार लावतात. आता कोरोना साथीच्या रुपाने पुन्हा एकदा संकट आले आहे. त्यासाठी पोलीस कर्मचारी कोरोनाच्या हॉटस्पॉट भागात देखील कायदा व सुव्यवस्था राखत आहेत, असे गृहमंत्री म्हणाले.
पोलीस दलाविषयी आदर म्हणून आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी मुंबई पोलीस दलाचा लोगो ठेवण्याचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून तळागाळातील कार्यकर्ते, गृहिणी, महाविद्यालयीन विद्यार्थी, राजकीय कार्यकर्ते, क्रिडापटू, सुप्रसिद्ध बॉलीवूड कलाकार या सर्वांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचे डीपी बदलले.
गृहमंत्री देशमुख यांच्या आवाहनाला अनेक नामांकित व्यक्तींनी प्रतिसाद देत बदलला डीपी -
अनेक नामांकित व्यक्तींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचे डीपी बदलले आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, पाटबंधारे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील; क्रिकेटर विराट कोहली; महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा; अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, अजय देवगन, अर्जुन कपूर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, सुनील शेट्टी, गुलशन ग्रोव्हर, रोहित रॉय, अर्जुन बाजवा, वत्सल शेठ, कतरिना कैफ, दीया मिर्झा, टिस्का चोप्रा, भाग्यश्री, मृणाल ठाकूर, पूजा हेगडे, हिना खान, संगीतकार जतिन पंडित आणि त्यांचा मुलगा राहुल; सुप्रसिद्ध चित्रपट प्रसिद्ध सालेहा योहान, चित्रपट निर्माते करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला, पटकथा लेखक रजत अरोरा, तालत अजीज आणि पेनाज मसानी, फॅशन डिझायनर नीता लुल्ला, मॉडेल-कोरिओग्राफर लुबना, शौर्य प्रताप सिंह यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीच्या अनेक राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे.