मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख ( Rishikesh Deshmukh ) यांना मंगळवारी (दि. 5 मार्च) मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर राहण्याचे समन्स मुंबई सत्र न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात काढले होते. ऋषिकेश देशमुख यांच्या वकीलांनी ऋषिकेश देशमुख आणि सहिल देशमुख यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर न राहण्याची परवानगी देण्यात यावी, असा अर्ज न्यायालयासमोर केला होता. त्यानंतर न्यायालयाने तो मान्य केला, त्यामुळे देशमुख कुटुंबीयांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
कथित शंभर कोटी घोटाळ्याप्रकरणी ईडीने ऋषिकेश देशमुख यांना अनेकदा नोटीस बजावली होती. मात्र, ऋषिकेश देशमुख ईडीच्या नोटीसला कुठलेही उत्तर दिले नाही. तसेच ते चौकशीलाही गेलेले नाही. तसेच त्यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयात दाखल केला आहे. मात्र, त्यावर अद्याप कुठलाही निर्णय आलेला नाही आहे. अनिल देशमुख यांनी जामीन अर्जासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी सत्र न्यायालयाने ऋषिकेश देशमुख आणि साहिल देशमुख यांना 5 एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे समन्स जारी केले होते. मात्र, ऋषिकेश देशमुख यांच्या वकिलाकडून आज अर्ज केल्याने त्यांना हजर न राहण्यापासून न्यायालयाकडून मुभा मिळाली आहे.
कथित 100 कोटी प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक केल्यापासून गेल्या 5 महिन्यांपासून अनिल देशमुख हे आर्थर रोड जेलमध्ये आहे. मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयात ईडीने सात हजार पानांचे पुरवणी आरोपपत्रही दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या मेहुण्यालाही सह आरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.