मुंबई: सिनेमा आणि संगीत क्षेत्राला आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या लता दीदींचे रविवारी सकाळी निधन झाले. निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण देशातील चाहत्या वर्गाला मोठा धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केले आणि अंतविधीला येणार असल्याचे जाहीर केले. पंतप्रधानांचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, राजशिष्टाचार मंत्री, राज्याचे मुख्य सचिव आदी उपस्थित असतात. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे औपचारिक स्वागत करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी विमानतळावर उतरताच स्वागत करणाऱ्या सगळ्यांना आपल्या शेलीत नमस्कार केला. ते आदित्य ठाकरे यांच्या जवळ आले आदित्य यांच्या सोबत त्यांनी काही क्षण संवाद साधला. प्रसार माध्यमावर हे चित्र चांगले व्हायरल झाले. आदित्य यांनीही मोठ्या आत्मविश्वासाने त्यांच्याशी संवाद साधल्याचे दिसून आले. मोदी यांनी आदित्य जवळ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रकृती विषयी चर्चा केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंत्यविधीच्या ठिकाणी गंभीर वातावरण होते तेथे मोदी पोचल्यावर तेथेही त्यांचे महाआघाडी सरकार मधिल मान्यवरांनी औपचारीक स्वागत केले. सर्वांना नमस्कार करत ते पुढे निघाले. पुढे राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे समोर बसलेले होते. पंतप्रधान मोदी येताच ते उभे राहिले मोदींनी सर्वांना नमस्कार केला. मुख्यमंत्री आणि शरद पवारांनीही त्यांना नमस्कार करत प्रतिसाद दिला. यावेळी उध्दव ठाकरे आणि त्यांच्यातही काही क्षण संवाद झाल्याचे नंतर पहायला मिळाले.