मुंबई - पहिल्याच मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकलचा खोळंबा झाला. या पहिल्याच पावसात रेल्वे आणि महापालिकाने नालेसफाई पूर्ण केल्याचा दावा फोल ठरला आहे. त्यानंतर गुरूवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मान्सूनसाठी रेल्वेने पूर्ण तयारी करणे आवश्यक असल्याची आधिकाऱ्याची कानउघडणी केली आहे. तर, मान्सूनचा पाऊस हाताळण्यासाठी रेल्वेच्या तांत्रिक आणि नागरी कामांच्या उपक्रमांच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबईसारख्या संस्थांशी चर्चा करून मदत घेण्याचा सल्ला रेल्वेला दिला.
आयआयटीची मदत घ्या -
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचा मुख्य मार्गावर कुर्ला ते सायन आणि हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते जीटीबीनगर स्थानकातील रेल्वे रुळ पाण्याखाली गेले होते. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल साडे नऊ तास ठप्प होती. यामुळे रेल्वेचा नालेसफाई पूर्ण केल्याचा दावा फोल ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मान्सून पूर्व कामाची गुरूवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पावसाळा सुरू होताच मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे वचनबद्ध आहे. उपनगरीय रेल्वेच्या सज्जतेचा आढावा घेताना, पावसामुळे उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी रेल्वेच्या तांत्रिक आणि नागरी कामांच्या उपक्रमांच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबईसारख्या संस्थांशी भागीदारी करण्याचा सल्ला त्यांनी मध्य रेल्वेला दिला आहे.
'मक स्पेशल' गाड्या तैनात-
रेल्वे सेवा सुरळीत आणि अखंडितपणे सुरू राहील हे सुनिश्चित करण्यासाठी नवोन्मेषी उपक्रम आणि परिश्रम एकत्र केले गेले पाहिजेत. याची दखल घ्यावी लागेल की, कोविड महामारीच्या दरम्यानही, मुंबईत खास सुधारित रेल्वे डब्यांसह ३ कचरा साफ करणाऱ्या 'मक स्पेशल' गाड्या तैनात करून उपनगरी विभागातील २ लाख १० हजार घन मीटर क्षेत्रातील घाण / कचरा / जमिनीच्या साफसफाईसाठी रेल्वेने मोठी कसरत केली आहे असे सुद्धा पियुष गोयल यांनी सांगितले आहे.
मागील पावसाळ्यात गेल्या होत्या या उपाययोजना -
गेल्या पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवलेली ठिकाणे शोधण्यात आली आणि प्रत्येक ठिकाणांसाठी अनुकूल उपाययोजना तयार करण्यात आल्या होत्या. ज्यात वांद्रे, अंधेरी, माहीम, ग्रँट रोड, गोरेगाव. पावसाची प्रत्यक्ष वेळेची आणि अचूक माहिती मिळावी या दृष्टीने स्वयंचलित पाऊस परिमाण (एआरजी) भारतीय हवामान विभागाच्या सहकार्याने चार ठिकाणी तर पश्चिम रेल्वेद्वारे स्वतंत्रपणे दहा ठिकाणी स्थापित केले आहेत. सांडपाणी आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी पाण्याच्या आतील पंपांसह रेल्वेमार्ग आणि डेपोवर पुरविण्यात आलेल्या पंपांची संख्या ३३ टक्यांनी वाढली आहे. बोरीवली विरार विभागातील नाल्याच्या साफसफाईची पाहणी आणि देखरेखीसाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता. नाल्याची खोलवर साफसफाई करण्यासाठी शोषयंत्रे/गाळ काढणारी यंत्रे वापरण्यात आली. कमीत कमी पाणी साचेल या दृष्टीने, नाला बांधताना नवीन मायक्रो टनेलिंग पद्धतीचा अवलंब केला गेला.
हेही वाचा - मुंबईतील आतापर्यंतच्या इमारत कोसळल्याच्या दुर्घटना!