मुंबई - राज्य सरकारने राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता हळहळू अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल केले आहे. त्याता आता राज्य सरकारने ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा नागरिकांना मुंबईमध्ये लोकल प्रवासासाठी सूट दिली आहे. मात्र, ही सर्व परिस्थिती पाहता राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका संभवू शकतो. यामुळे निर्बंध शिथिल केल्यामुळे नागरिकांची जबाबदारी वाढली आहे, असे मत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने व्यक्त केले आहे.
सामनामध्ये काय म्हटले?
"केरळमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने धडक दिली आहे. जगभरात कोरोनाच्या ज्या 'डेल्टा प्लस' व्हेरिएंटने आता हाहाकार माजविला आहे त्या व्हेरिएंटचे रुग्ण मुंबईसह महाराष्ट्रातही आढळू लागले आहेत. कोरोनाचा हा 'अलार्म' लक्षात घेऊनच निर्बंधांबाबतचे निर्णय राज्य सरकारला घ्यावे लागतील. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मुंबईतील लोकल प्रवासाची मुभा, पुण्यातील निर्बंधांमध्ये आणखी सूट आणि इतर काही निर्णय त्याच पद्धतीने घेण्यात आले आहेत. सद्यस्थितीत आवश्यक आणि शक्य ते निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. पुढेही परिस्थितीनुरूप निर्णय घेतलेच जातील. मात्र, आता निर्बंध शिथिल होत असताना सरकार-प्रशासनासह जनतेची जबाबदारीही वाढली आहे हे लक्षात घ्यायला हवे. 'निर्बंध कमी झाले आणि कोरोना पुन्हा वाढला' असे होणार नाही याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे.
कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले आहेत त्या मुंबईकरांना अखेर लोकल प्रवासाची मुभा मिळाली आहे. जवळपास साडेतीन महिन्यांनंतर कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी 15 ऑगस्टपासून लोकलचे दरवाजे उघडणार आहेत. कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी कमी झाली आहे. मधल्या काळात कोरोना लसीचे दोन्ही डोसही अनेकांनी घेतले आहेत. त्यामुळे त्यांना तरी लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी होत होती. कोरोनाची दुसरी लाट अजून पूर्ण ओसरलेली नाही. त्यात तिसऱ्या लाटेचे संकेत आहेत. त्यामुळे लोकल ही सर्वसामान्य मुंबईकरांची निकड असली तरी सर्व बाजूंचा आणि धोक्यांचा विचार करूनच निर्णय घेणे योग्य होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार, लोकलमुळे वाढणारी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगच्या बंधनाचे उल्लंघन होण्याची शक्यता आणि त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याचा धोका या सर्व गोष्टींचा विचार विरोधक करीत नसले तरी राज्याच्या जनतेचे पालक असलेल्या सरकारला करायलाच हवा.
सामान्य माणसाचे रहाटगाडगे आणि व्यापार-उद्योगाचे चक्र सुरळीत सुरू राहायलाच हवे. मात्र, कोरोनाची टांगती तलवार आजही आपल्या डोक्यावर आहेच. ती पूर्णपणे हटलेली नाही आणि लसीकरणदेखील संपूर्ण झालेले नाही. सद्यस्थितीत आवश्यक आणि शक्य ते निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. पुढेही परिस्थितीनुरूप निर्णय घेतलेच जातील. मात्र आता निर्बंध शिथिल होत असताना सरकार-प्रशासनासह जनतेची जबाबदारीही वाढली आहे हे लक्षात घ्यायला हवे. 'निर्बंध कमी झाले आणि कोरोना पुन्हा वाढला' असे होणार नाही याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे".