मुंबई - सोशल माध्यमांचा वापर करून मुंबईतील पवई व वांद्रे परिसरातील दोन शास्त्रज्ञांना लाखो रुपयांना फसवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यासंदर्भात पवई पोलीस ठाणे आणि वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवई या ठिकाणी राहणार्या एका 67 वर्षीय निवृत्त शास्त्रज्ञासोबत मॉर्गन नावाच्या महिलेने फेसबुकवर मैत्री केली. या दरम्यान दोघांनी एकमेकांचा मोबाईल क्रमांक शेअर केला. या महिलेने ती एका औषधाच्या कंपनीत कामाला असून तिच्या कंपनीत बनवण्यात येणाऱया औषधी तेलाला परदेशात मोठी मागणी आहे, असे शास्त्रज्ञाला सांगितले.
हेही वाचा - 'प्रिन्स'ची प्रकृती चिंताजनक; केईएम रुग्णालयाची माहिती
पाच हजार डॉलरला विकले जाणारे हे तेल दिल्लीत राहणार्या एका डॉक्टरकडून अडीच हजार डॉलरला विकले जात आहे. यामधून मोठा फायदा होईल असे तिने सांगितले. दिल्लीतील डॉक्टरकडून तेल विकत घेण्यासाठी तिने शास्त्रज्ञाला साडेतीन लाख रुपये भरण्यास सांगितले. महिलेच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन निवृत्त शास्त्रज्ञाने साडेतीन लाख रुपये भरले. मात्र, खुप दिवस होऊनही तेलाची डिलिव्हरी न मिळाल्यामुळे त्याने महिलेला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन नंबर बंद होता. आपण फसले गेलो असल्याचे लक्षात आल्यानंतर पवई पोलीस ठाण्यामध्ये या शास्त्रज्ञाने तक्रार नोंदवली.
हेही वाचा - मॅनहोलमध्ये उतरणारे रोबोट मुंबई महानगरपालिकेच्या दिमतीला
दुसऱ्या प्रकरणात मुंबईतील वांद्रे परिसरात राहणाऱ्या एका शास्त्रज्ञाच्या घरातील सामान शिफ्ट करायचे होते. 'मूव्हर्स अँड पॅकर्स'सोबत संपर्क साधला. दोन व्यक्तींनी पीडित शास्त्रज्ञाच्या घरी येऊन घरातील सामानाची पाहणी केली. सामान दुसऱ्याजागी हलवण्यासाठी 79 हजार रुपये खर्च येईल. त्यातील 59 हजार रुपये अगोदर भरावे लागतील असे या दोन भामट्यांनी शास्त्रज्ञाला सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार 59 हजार रुपये भरल्यानंतरही शास्त्रज्ञाच्या घरातील सामान शिफ्ट केले नाही. त्यामुळे या शास्त्रज्ञाने वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.