मुंबई - कोरोना रुग्णसंख्येचा आकडा राज्यात दिवसा 30 हजारपर्यंत पोहचल्याने वाढणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी खाटा कशा मिळतात? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होत गेल्याने अनेक ठिकाणी कोरोना केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. मात्र, अलिकडे रुग्णसंख्येने चांगलीच उचल खाल्ल्याने आता पुन्हा खाटा मिळण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी राज्यात काही ठिकाणी अजून खाटांची संख्या पुरेसी आहे, तर काही ठिकाणी खाट कमी पडत असल्याचे दिसून आले आहे.
नागपुरात नव्या रुग्णांना खाटा मिळेनात
उपराजधानी नागपुरात कोरोनाची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. दररोज साडेतीन हजारांपेक्षा जास्त नागरिक कोरोनाबाधित होत असल्याने शासकीय आणि खासगी रुग्णालयाच्या कोविड कक्षातील खाटा फुल्ल झाल्या आहेत. सध्या नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्ण हे कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे नव्या रुग्णांना खाटा मिळत नसल्याची भीषण परिस्थिती पुन्हा उद्भवली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निवासासह अनेक ठिकाणी पुन्हा नव्याने कोरोना केंद्रे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या नागपूर शहरात शासकीय आणि काही खासगी रुग्णालयात ७०८ ऑक्सिजन असलेल्या खाटा उपलब्ध असल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली आहे.
पुण्यात राखीव खाटांची संख्या..
पुणे शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी असली तरी जवळपास 75 ते 80 टक्के रुग्ण हे गृह विलगणीकरणामध्ये आहेत. तर सध्या 3,373 कोरोनाबाधित रुग्णालयामध्ये दाखल आहेत. पुणे शहरात कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या खाटांची संख्या 3,937 इतकी असून एकूण खाटांपैकी 564 शिल्लक आहेत. सोमवारी 22 मार्चपासून जम्बो कोविड रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सोमवारी या रुग्णालयात 53 खाटांची व्यवस्था करण्यात आली असून आठवडाभरात 500 खाटा कार्यान्वित केले जाणार आहेत. यामध्ये 100 च्या वर आयसीयू आणि 250 ऑक्सिजन खाटा उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
औरंगाबादमध्ये खाटा वाढवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
औरंगाबादमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने खाटा वाढवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. शहरी भागात सीसीसी, डिसीएच आणि डिसीएचसी या उपचार सुविधांमध्ये 6014 खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर ग्रामीण भागात सीसीसीमध्ये 1,244, डीसीएचसी मध्ये 225 खाटा उपलब्ध आहेत. तसेच वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात उपचार सुविधा आणि खटांची उपलब्धता करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खाटांच्या उपलब्धतेच्या माहितीसाठी काही क्रमांक जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.
मुंबईत ४७ टक्के खाटा रिक्त
कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष झाल्यानंतर मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत असताना यातील बहुसंख्य रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे रुग्णालय आणि कोविड केंद्रांमधील सुमारे ४७ टक्के खाटा रिक्त आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यांना सोयी व सुविधा देऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पालिका सज्ज असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - ठाकरे सरकारकडून 600 कोटी रुपयांचा एसआरए घोटाळा; किरीट सोमैयांचा आरोप
हेही वाचा - शरद पवारांचा अनिल देशमुखांना पाठीशी घालण्याचा डाव फसला - देवेंद्र फडणवीस
हेही वाचा - पैसे मोजायचे मशिन, फाईव्ह स्टार हॉटेलची राहणी, आता सापडली गोपनीय डायरी