मुंबई - संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा महामंडळाच्या साडे नऊ हजार निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यालय, आगारात चकरा माराव्या लागत आहेत. याबाबत सर्वप्रथम बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केली व हा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर आता महामंडळाने 9 हजार 500 निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन करारातील फरक, शिल्लक रजा व वेतनवाढ फरकेचे पैसे देण्यात येत आहे.आता एसटी कामगार संघटनेचा या लढ्याला यश येत असून संघटनेच्या नेत्यांनी 'ईटिव्ही भारत'चे आभार मानले आहे.
दोनशे कोटी रुपये होते थकीत
एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जाते. मात्र, 1 जून 2018 पासून राज्यभरातील तब्बल 9 हजार 500 निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही महामंडळाकडून पैसे मिळालेले नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 200 कोटी रुपये देणे थकीत होते. अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या मुख्यालयात गेल्या दोन वर्षापासून चकरा मारत होते. मात्र, निवृत्तीनंतरची सर्व देणी तत्काळ देण्याचे परिपत्रक असतानाही निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे कोणीही ऐकत नव्हते. याबाबतचे वृत्त 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केले होते. यानंतर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने महामंडळ आणि राज्य शासनाकडे पत्र व्यवहार केला होता. निवृत्त झालेल्या चालक-वाहक यांत्रिक कर्मचारी यांना सरसकट सर्व कामगारांना निवृत्तीचे थकीत पैसे व्याजासह देण्याची मागणी केली होती.
कर्मचाऱ्यांना मिळाली थकीत देणी
एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना थकीत देणी मिळावी यासाठी मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेकडून परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली. त्यावर सतेज पाटील यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करून न्याय देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. सतेज पाटील यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूर विभागास 3 कोटी 51 लाख रुपयांचा निधी मिळाला व त्याअनुषंगाने कोल्हापूर विभागात डिसेंबर 2018 अखेरपर्यंत सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्याना वेतन करार व वेतन वाढ फरकापोटी 2 कोटी 92 लाख तसेच शिल्लक रजेबद्दल 55 लाख एवढी रक्कम अदा करण्यात आली. आता राज्यातील सर्व विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी थकीत देण्याचे काम सुरू झाले आहे.
'ईटीव्ही भारत'मुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय - श्रीरंग बरगे
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, 'ईटीव्ही भारत' नेहमी कामगारांच्या समस्यांवर प्रकाश टाकत असते. आज 'ईटीव्ही भारत'मुळेच एसटी महामंडळातील सेवानिवृत्त 9 हजार 500 एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले निवृत्ती नंतरचे, रजेचे व वेतनवाढ फरकाचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यासाठी आम्ही 'ईटीव्ही भारत'चे आभार मानतो.
हेही वाचा - बनावट लस प्रकरणातील लाभार्थ्यांना लसीकरणासाठी पाहावी लागणार वाट
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा