मुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए) सुनिल माने याला पाचवा आरोपी म्हणून अटक केले आहे. सुनिल मानेच्या घरी एनआयएने रविवारी छापेमारी केली. त्याच्या घरातून आणि कार्यालयातून काही महत्त्वाची कागदपञे आणि मानेची लाल रंगाची क्रेटा कार हस्तगत केली आहे. माने आपल्या कारसाठी बनावट नंबर वापरत असल्याचे तपासात समोर आले.
मनसुख हत्या प्रकरणात सुनील मानेचा सहभाग काय?
सुत्रांच्या माहितीनुसार सुनील माने 2 ते 4 मार्चदरम्यान दररोज सीआययू पथकात येत होता. 3 मार्चला जेव्हा मनसुख हिरेन सीआययु पथकात आला होता. त्या बैठकीलाही सुनील माने हजर होते. सुत्रांच्या माहितीनुसार सुनील माने त्या बैठकीत मनसुखवर अँटिलिया स्फोटके प्रकरणात अटक होण्यासाठी दबाव टाकत होते. एनआयएच्या तपासात हेही स्पष्ट झाले होते, की मनसुख अटक होण्यासाठी तयार नसल्याने वाझेंनी सुनील मानेला सांगितले होते. तसेच मनसुखला काही दिवस गायब करू त्यानंतर जे होईल ते पाहता येईल, असेही सांगितले होते.
दरम्यान, मनसुखला हत्येच्या दिवशी फोन करणारा विनायक शिंदे नसून सुनील मानेच असल्याचे तपासात समोर आले आहे. सुनील माने यानेच फोन करून मनसुखला हत्येच्या दिवशी बोलावले होते. मनसुखच्या हत्येवेळी माने घटनास्थळी दाखल झाला होता, अशीही माहिती एनआयएने दिली आहे.
मनसुखच्या तोंडात वाझेनेच कोंबले रुमाल..
मनसुखची हत्या करण्यात आली त्यावेळी त्याच्या तोंडात ५ ते ६ रुमाल कोंबलेले होते. हे रुमाल दुसरं तिसरं कुणी नाही, तर सचिन वाझेनेच कोंबल्याचं सांगितलं जात आहे. हत्येच्या दिवशी वाझे हे सीसीटिव्हींची नजर चुकवत लोकलने ठाण्याला आले होते. त्यावेळी कळवा स्थानकावर त्यांनी हे रुमाल खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. एनआयएने कळवा स्थानक परिसरातले सीसीटीव्ही तपासले असता, वाझेंसारखी एक व्यक्ती रुमाल खरेदी करत असल्याचे दिसून आले आहे. सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असले, तरी देहबोली आणि कपड्याचा रंग ही वाझेंसारखीच आहे, असे सांगण्यात येत आहे.