मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आयात केलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मलिक यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
नवाब मलिक म्हणाले की, उद्धव ठाकरे हे कायम दुट्टप्पी भूमिका घेतात. श्रीनिवास वनगा यांना भाजपमधून शिवसेनेत घेतले व खासदारकीची पोटनिवडणूक लढवली आणि आता त्याच श्रीनिवास वनगा यांचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लोकसभेचे तिकीट कापले आहे. त्यामुळे इतरांच्या मुलांचे पालनपोषण शिवसेना कसे करते हे स्पष्ट होते आहे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. ठाकरे यांचा बेगडीपणा समोर आला असल्याची टीका मलिक यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी नुकतेच इतरांच्या मुलांचे पालनपोषण करतो असे विधान केले होते. पण शिवसेनेसाठी आयुष्य वेचलेल्या शिवसैनिकाच्या मुलाला लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. त्याऐवजी इतरांच्या मुलाला कसे सांभाळतो, याचा एक दाखला ठाकरे यांनी दिला असल्याची खोचक टीकाही नवाब मलिक यांनी ठाकरेंवर केली आहे.