मुंबई - अजित पवार करत असलेले ट्विट ते स्वत: करत आहेत की एजन्सीमार्फत केले जात आहेत हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. पवईतील रेनिन्सन हॉटेलमधे पक्षाच्या आमदारांची भेट घेतल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
नवाब मलिक म्हणाले, "अजित पवार काही ट्विट करत आहेत. त्यांचे ट्विटर ते स्वत: वापरत आहेत की एखादी एजन्सी हे पाहणे गरजेचे आहे. त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचाच भाग असल्याचेही एका ट्विटमध्ये म्हटले आहे. मला आशा आहे की, त्यांची चूक त्यांच्या लक्षात येईल आणि ते स्वगृही परततील"
आज दुपारी अजित पवार यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर आलेल्या शुभेच्छांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. त्याचबरोबर शरद पवारच आपले नेते आहेत असे स्पष्ट करणारे एक ट्विटही त्यांनी केले आहे. मात्र त्यावर शरद पवारांनी अजित पवार यांनी केलेले ट्विट दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा - ठाकरे-पवार भेटीनंतर राष्ट्रवादीचे आमदार रेनिन्सन हॉटेलवरुन दुसरीकडे हलवणार
आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्श केल्याची माहिती मलिक यांनी यावेळी दिली. 50 आमदार सध्या आमच्याकडे असून बहुमत चाचणीवेळी आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पाडणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.