मुंबई - केंद्रात सत्तेत असलेले भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणेला हाताशी धरून आघाडी सरकारमधील नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहे. मात्र, आता या कारवायांवर आघाडी सरकारमधील प्रत्येक नेता सडेतोड उत्तर देईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.
कारण नसताना ईडी (सक्तवसुली संचालनालय)कडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन वर्षांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने साथ देत विधानसभेत अधिकच्या जागा निवडून दिल्या. आता माझ्या जावयावर आरोप होत आहेत. मात्र, या आरोपांबाबत कायदेशीर लढाई आपण न्यायालयात लढत असून जावया विरोधात एनसीबीकडे कोणतेही पुरावे नसल्याचे नवाब मलिक यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
आम्ही कधीही जाती-धर्माचे राजकारण केले नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता नव्याने "गर्व से कहो हम हिंदू है", असा नारा द्यायला सुरुवात केली आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला हिंदू नेता म्हणून सांगत होते. मात्र, आम्ही कधीही जाती-धर्माचे राजकारण केले नाही आणि करणार नाही, असे नाव मलिक यावेळी म्हणाले.
हेही वाचा - आर्यनला कॉन्सलिंग केल्याचा व्हिडीओ एनसीबीने समोर आणावा - नवाब मलिक