मुंबई - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जोर धरत आहे. पश्चिम बंगाल राज्यात तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची थेट लढत आहे. मात्र, केंद्रात असलेल्या सत्तेचा गैरवापर भाजप निवडणुकीसाठी करत आहे. तसेच देशात ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही, तिथे मुख्यमंत्र्यांना त्रास दिला जातोय. म्हणूनच आता भाजपच्या विरोधात एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे, अशा आशयाचे पत्र ममता बॅनर्जींनी देशातील भाजप व्यतिरिक्त असलेल्या मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील सर्व भाजप व्यतिरिक्त असलेल्या मुख्यमंत्री आणि प्रमुख नेत्यांना पत्र लिहून मदतीचे आवाहन केले आहे. देशभरात जे कोणी भाजप व्यतिरिक्त नेते आहेत, त्या सर्वांनी एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढण्याची वेळ आली असून भारतीय जनता पक्षाला थांबवायचे असेल तर एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, असे पत्रात त्यांनी लिहिले आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुक्ती आणि फारुक अब्दुल्ला या सर्वांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहिले आहे.
भाजपकडून केंद्राच्या सत्तेचा गैरवापर - ममता दीदी
भारतीय जनता पक्षाकडून कशाप्रकारे राज्य सरकारचे अधिकार हिरावून घेण्याचा गेल्या काही वर्षापासून प्रयत्न सुरू आहे. हे सांगण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांनी आपल्या पत्रातून केला आहे. यासाठी दिल्ली राज्याचे उदाहरण देत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अधिकार कमी करण्यासाठी उपराज्यपाल अधिकार वाढवण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत असून हे असंवैधानिक आहे. तसेच ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही, त्या राज्यांना कमी निधी दिला जातो. राज्याची केंद्र सरकारकडे असलेली कामे होऊ दिली जात नाही. राज्यपालांना राज्याच्या निर्णयांमध्ये ढवळाढवळ करण्यास सांगितले जाते. अशा प्रकारचे आरोप ममता बॅनर्जी यांनी आपल्या पत्रातून केंद्र सरकारवर लावले आहेत. त्यामुळे आता सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात लढण्याची तयारी दाखवली पाहिजे. सोबतच पश्चिम बंगालमध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजप केंद्र सरकारमध्ये असलेल्या आपल्या सत्तेचा कसा दुरुपयोग करतोय याचे हे सांगण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांनी पत्रातून केला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून ममता दीदींना पाठिंबा
ममता बॅनर्जी यांनी लिहिलेले पत्र हे योग्य असून सध्या देशभरात भाजप आपल्या सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीत खुद्द ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी शरद पवार हे जाणार होते. मात्र, अचानक त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे ते जाऊ शकले नाहीत. पण येणाऱ्या काळात शरद पवार यांची प्रकृती चांगली झाली तर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी शरद पवार पश्चिम बंगालमध्ये जातील, असे संकेत नवाब मलिक यांनी दिलेत. तसेच ममता बॅनर्जी यांनी आपल्या पत्रातून जी भूमिका भाजपच्या विरोधात मांडली आहे ती, सत्य असून त्याच्या विरोधात उभे राहणे गरजेचे असल्याचे देखील नवाब मलिक यांनी सांगितले.
तर तिथेच काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी देखील ममता बॅनर्जी यांच्या पत्राचे समर्थन करून, ममता बॅनर्जी यांनी जे मुद्दे पत्रात मांडले आहेत, ते मुद्दे काँग्रेस सातत्याने समोर आणत आहे. भाजपच्या विरोधात लढायचे असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, हे काँग्रेस नेत्यांच्या खूप आधीच लक्षात आले आहे. या कारणाने सर्व पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेस भाजपचा सामना करत असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्याकडून देण्यात आले आहे.