मुंबई : मुंबईमध्ये तीन दहशतवादी घुसल्याचा फोन नवी मुंबई पोलिसांच्या ११२ क्रमांकावर आला होता. मी, पोलीस बोलतोय असे सांगून मुंबईत आतंकवादी घुसले असल्याची माहिती फोनवर देण्यात आली होती. या फोनमुळे मुंबई पोलिसांच्या डोकेदुखीत आणखीच वाढ झाली आहे. नवी मुंबई पोलिसांनी लगेचच ही माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे. या काॅलची दखल घेत सर्व स्थानिक पोलीस ठाण्यांना पून्हा एकदा सुरक्षेसाठी अर्लट करण्यात आले आहे.
मुंबईत आतंकवादी घुसले : मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास एक काॅल आला होता. पोलिसांकडून या काॅलरचा शोध सुरु असतानाच शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास नवी मुंबई पोलिसांना ११२ क्रमांकावर अनोळखी नंबरवरुन परत काॅल आला. विशेष म्हणजे काॅल करणाऱ्याने पोलीस बोलतोय असे सांगितले. त्यानंतर त्याने मुंबईत आतंकवादी घुसल्याचे सांगून फोन कट करण्यात आला. काॅल करण्यासाठी वापरण्यात आलेल्या नंबरचा पोलिसांनी शोध घेतला असता तो धुळे येथून बोलत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याआधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. गेला अनेक महिन्यांपासून असे धमकीचे कॉल, मेल, एसएमएस मुंबई पोलीस दलाला येत आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांची त्यामुळे झोप उडाली आहे. डोळ्यात तेल घालून मुंबई सज्ज असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून देण्यात आली आहे.
फोनचा काॅलचा तपास सुरु : मुंबईमध्ये तीन दहशतवादी घुसले असून त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा करणारा एक कॉल शुक्रवारी दुपारी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात आल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. मुंबई पोलिसांनी या कॉलची दखल घेत मुंबईत हाय अलर्ट जारी करत शहरातील बंदोबस्तात वाढ केली. तसेच, या काॅलची माहिती राज्यातील, केंद्रातील गुप्तचर, तपास यंत्रणांना देत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात हा खोटा काॅल असल्याचे स्पष्ट झाले असून काॅल करणाऱ्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या काॅलरचा शोध सुरु असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी आलेला कॉल हा अफवा पसरविणारा असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.