नवी मुंबई - शहरात कोरोनाचे थैमान पाहता नवी मुंबईचा समावेश हा प्रलंबित क्षेत्रात करण्यात आला आहे. यामुळे लॉकडाऊनमधील निर्बंधावर विचार करुन आजपासून (20 एप्रिल) अनेक बाबतीत परवानगी देण्यात येणार. त्यात नवी मुंबईचा समावेश नाही, मात्र आजपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केट सुरू करण्यात आले आहे.
नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढतेच आहे. आजही कोरोनाचे 3 रुग्ण नवी मुंबईत सापडले असून नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 69 पर्यत पोहोचला आहे. कोरोनाचा थैमान पाहता शहरात 19 कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे 20 तारखेनंतर लॉकडाऊन संदर्भात काही भागात व शहरात नियम शिथिल होणार होते. त्यात नवी मुंबईचा समावेश नाही असे असतानाही नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार सुरू असून आजपासून फळ मार्केटही सुरू करण्यात आले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नवी मुंबईतील एपीएमसीतील फळ मार्केट 11 एप्रिलपासून बंद ठेवण्यात आले होते. मात्र, हे फळ मार्केट आजपासून (सोमवार) सुरू करण्यात आले आहे. मुंबई एपीएमसी प्रशासक, व्यापारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, फळ मार्केट पुन्हा सुरू झाले असले तरी यात काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
बाजार आवारात 200 ते 250 गाड्यांचीच आवक होणार आहे. तसेच यात हापूस आंब्याच्या 150 गाड्यांचा समावेश असला तरी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियम न पाळल्यास मार्केट पुन्हा बंद केले जाईल, अशी सक्त ताकीदही देण्यात आली आहे. तसेच खरबूज व कलिंगड यांची विक्री तुर्भे येथील एसटी महामंडळाच्या जागेत करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई हे रेड झोन म्हणून जाहीर झाले असल्याची माहितीही दिली.