मुंबई - मुंबईतील झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी कंत्राट दिला जातो. तो कंत्राटदार तिच लाकडे स्मशानात विकतो. पालिकेला झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी तसेच स्मशानातील जळाऊ लाकडे या दोन्हीसाठी खर्च करावा लागतो. मात्र यात पालिकेचे नुकसान होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणले गेले. आता मुंबईतील स्मशानभूमी धूरमुक्त करण्याचे धोरण पालिकेने आखल्याचे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्थायी समितीत दिले.
काय आहे प्रस्ताव?
मुंबईत 54 हिंदू स्मशान भूमी आहेत. मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी येथे जळाऊ लाकडांचा वापर केला जातो. लाकूड मनपा मोफत पुरवठा करते. पालिकेकडून कंत्राटदाराला 825 रु. किलो दराने रक्कम दिली जाते. या लाकूड खरेदीसाठी 35 कोटी 74 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. स्थायी समितीत खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. सर्वपक्षिय नगरसेवकांनी लाकडाऐवजी पर्यावरण पूरक, धूर मुक्त घटकांचा वापर करावा, अशी सुचना केली.
कंत्राटदाराला फायदा
मुंबईत बेसुमारे फांद्याची छाटणी, वृक्षतोड होते. या लाकडांचे होते काय, ती कुठे जातात कुठे? असा प्रश्न भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला. ठेकेदार हीच लाकडे स्मशानभूमीसाठी विकतो का? याची चाचपणी करावी. तसे होत असल्यास प्रशासनाला दुहेरी आर्थिक फटका बसणार असल्याची बाब समितीच्या निदर्शनास आणून दिली.
तांदळाच्या तसूचा वापर करा
नागपूर पालिकेकडून स्मशानभूमीत तांदळाच्या तसूपासून तयार केलेल्या विटांचा वापर केला जातो. त्यामुळे धूर, प्रदूषण होत नाही. पर्यावरणाला हानी पोहचत नाही. शिवाय, आर्थिक बचत देखील होते, असे मत राऊत यांनी मांडले. भाजपचे सदस्य मकरंद नार्वेकर यांनीही चंदनवाडी स्मशानभूमीत पर्यावरणपूरक असलेल्या विद्युतवाहिनीचा पर्याय आहे. त्यानुसार इतरही स्मशानभूमीत त्याचा अवलंब करावा, अशी सूचना केली.
प्रदूषण मुक्ततेवर भर
हे काम दोन वर्षांसाठी दिले जाणार आहे. लाकडाऐवजी पर्यावरणपूरक, प्रदुषणविरहीत, धूर मुक्त पर्याय विचाराधीन आहेत. नागपूरमध्ये स्मशानभूमीत तांदळाच्या तसूपासून तयार केलेल्या विटासदृश्य घटकांचा वापर केला जातो. त्याच धर्तीवर मुंबईतही असे पर्याय तपासले जातील, असे स्पष्टीकरण मनपा अतिरिक्त आयुक्त भिडे यांनी केले.
हेही वाचा - 'माझे बाळ मला परत पाहिजे'; बाळासाठी मातांचा टाहो