मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या काळातच मुंबई विद्यापीठाच्या प्रथम सत्र २०१९ च्या (उन्हाळी सत्राच्या) महाविद्यालयीन प्रथम व द्वितीय वर्षाच्या व विद्यापीठ स्तरावरील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यासाठी आज शनिवार विद्यापीठाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या काळातच या परीक्षा येत असल्याने राज्यातील निवडणुका आणि त्यांचा कार्यक्रम लक्षात घेऊन त्यात बदल करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने सांगितले.
या परीक्षांच्या तारखा नुकत्याच झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. विद्यापीठ उन्हाळी सत्राच्या ४८६ व महाविद्यालयाच्या ६४ अशा एकूण ५५० परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. नवीन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार सर्व अभ्यासक्रमाची ४ विद्या शाखेमध्ये विभागणी झाली आहे. यानुसार प्रमुख विद्याशाखा व उपविद्याशाखा यानुसार या परीक्षांची ही विभागणी झालेली आहे. या परीक्षा २५ मार्च पासून ते १० जून पर्यंत चालणार आहे. यातील अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नसल्या तरी त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
लवकरच संकेतस्थळावर वेळापत्रक होईल प्रसिद्ध-
परीक्षा विभागातील परीक्षा व निकाल विभागाचे उपकुलसचिव कृष्णा पराड व त्यांच्या विभागाने या परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक तयार केले आहे. वेळापत्रक तयार करताना त्या-त्या विद्याशाखांचे ९० दिवसांचे सत्र, सुट्ट्या व इतर विविध व्यावसायिक परीक्षा याचाही विचार करून या तारखांचे वेळापत्रक तयार केले आहे. यावर्षी विद्यापीठ प्रथमच सत्रसाठी पसंतीनुसार श्रेणी पद्धत राबवीत आहे. या सर्व परीक्षांच्या तारखा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर असून याचे वेळापत्रकही लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या जाहीर होणाऱ्या तारखामुळे काही परीक्षांच्या तारखेमध्ये बदल होऊ शकतो, याकडे विद्यार्थी व पालकांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.