मुंबई - महाविद्यालयातील क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसीच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने मोठा दिलासा दिला आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची अतिरिक्त परीक्षा घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई विद्यापीठाने सोमवारी विद्या परिषदेत घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने विद्यापीठाने सर्वसमावेशक अशी योजना तयार केली आहे. हा निर्णय विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनाही लागू होणार आहे.
विशेष म्हणजे विद्यापीठाचे किंवा महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करताना परीक्षांना मुकाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांकडून या अतिरिक्त परीक्षेला बसताना शुल्क आकारले जाणार नाही. नियोजित परीक्षा संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही विद्या परिषदेत ठरविण्यात आले आहे.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर म्हणाले "मुंबई विद्यापीठ आणि सलंग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी हे विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन महाविद्यालये आणि विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत असतात. अनेक विद्यार्थी त्यांच्या कलागुणांच्या जोरावर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करुन महाविद्यालय आणि विद्यापीठाचे नावलौकीक करत असतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे, असे समजून अतिरिक्त परीक्षा घेण्याचा निर्णय आजच्या विद्या परिषदेत आम्ही घेतला आहे."