मुंबई - उच्च न्यायालयात आज अर्णब गोस्वामीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. अर्णबच्यावतीने वकील हरीश साळवे यांनी निवेदन सादर केले. जर समन जारी केले गेले, तर याचिकाकर्ता हजर होऊन अधिकाऱ्यांना सहकार्य करेल, असे वकील हरीश साळवे म्हणाले. येत्या 5 नोव्हेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
मुंबई पोलिसांनी चॅनेलच्या टीआरपी घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल केला असून, हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी सोपवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका अर्णबने दाखल केली होती. अर्णबतर्फे ज्येष्ठ वकील हरीश साळवे, तर मुंबई पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयापुढे बाजू मांडली.
पोलिसांकडून चलचित्र वाहिन्यांच्या (टीव्ही चॅनल्स) टीआरपी घोटाळ्याचा एक मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. आपल्या चॅनेलचा टीआरपी जास्त यावा यासाठी काही चॅनल्स संबंधितांना पैसे देऊन दिवसभर टीव्ही सुरू ठेवत ते चॅनल लावण्यास सांगत होते. हे रॅकेट देशासह विदेशातही अस्तित्वात असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी दिली. काही दिवसापुर्वी मुंबईचे कमिश्नर परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत याबाबतीत खुलासा केला होता. या प्रकरणात काही वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती समोर आली होती.