मुंबई - ईशान्य काँग्रेस मुंबईतर्फे प्र. के. अत्रे मैदान ते पंतनगर पोलीस ठाणे असा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या घालणाऱ्या पूजा पांडे विरुद्ध तक्रार दाखल करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ नेते वीरेंद्र बक्षी यांनी यावेळी दिले.
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी अलिगढ येथील हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे या महिलेने गांधीजींच्या प्रतिमेवर एअर पिस्तूलातून गोळी मारून प्रतिकात्मक हत्या केली. त्यानंतर तो व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकून हत्येचे समर्थन केले होते. त्यावेळी त्यांच्या सहकार्यांनीही पेढे वाटून आनंद व्यक्त केला होता.
मुंबईतील 45 पोलीस ठाण्यात पूजा पांडे आणि तिच्या सहकारी लोकांवर गुन्हा नोंद करण्यात यावा, यासाठी मुंबई काँग्रेसने निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. त्यातील एक पंतनगर पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले व गांधीजींच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. समाजमाध्यमावर व्हिडिओ टाकून पूजा पांडे आणि तिच्या सहकारी लोकांची विकृत मानसिकता दिसून येते. देशामध्ये देशविघातक कारवाया करून जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. विचारांनी उत्तर देता येत नाही म्हणून शस्त्राचा वापर करून दहशतवादी कृत्यांना समर्थन देण्यात आले आहे. हा देशाचा अपमान आहे. अशा प्रकारच्या कृत्याने देशातील शांतता भंग होऊन उद्रेक होतो. तसेच देशात दंगे निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी महिला काँग्रेस आघाडीच्या सुमन सूर्यवंशी म्हणाल्या.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा अपमान हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. हा निषेध जातीय वादाचा नसून देशाचा अपमान करणाऱ्याचा आहे. यावर राष्ट्रीय भावनेचा विचार करून पोलिसांनी शस्त्र बाळगणे, देशद्रोह करणे, देशात दहशत निर्माण करणे, कायदा हाती घेणे यानुसार तत्काळ हिंदू महासभेवर भारतीय दंड कलम १४७, १४८, १४९, १५३ अ, २९५ अ, २८५ (मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल) ५०४ नुसार गुन्हा नोंदवून कार्यवाही करण्यात यावी तसेच समाजमाध्यमावर प्रक्षभोक व्हिडिओ पसरविण्याखाली सायबर गुन्हा २००० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा, असे काँग्रेस महिला राष्ट्रीय जनरल आघाडीच्या सेक्रेटरी जेनेट डिसुझा म्हणाल्या.
यावेळी मोर्चेकरी लोकांचे निवेदन पंतनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस अधिकारी रोहिणी काळे यांनी स्वीकारले. वरिष्ठांच्या आदेशाने लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी म्हटले.