मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांना काही दिवसापासून श्वसनाचा त्रास होता. यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी निदान झाले. तर अमिताभ यांच्यासोबत त्यांचे पुत्र अभिनेता अभिषेक बच्चन यालादेखील कोरोनाची बाधा झाली आहे. यानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमिताभ हे आयसोलेशन वॉर्डमध्ये तर अभिषेक बच्चन साध्या वॉर्डमध्ये ऍडमिट आहेत.
सध्या अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना देखरेखीसाठी आयसोलशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवणार नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अमिताभ यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालय प्रशासनाकडून कोणतेही मेडिकल बुलेटिन काढले जाणार नाही. अमिताभ बच्चन स्वत: ट्विटरवरून त्यांच्या प्रकृतीची माहिती देत राहतील, असे नानावटी रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्याने महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी, कर्मचारी वर्गांनी रॅपिड टेस्ट करून घेतली. यात स्वतः अमिताभ बच्चन आणि त्यांचे पुत्र अभिनेता अभिषेक बच्चनही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. याची माहिती प्रथम स्वतः अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून काल (शनिवारी) रात्री दिली. यानंतर अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन, नात आराध्या यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. बच्चन यांच्या प्रकृतीची माहिती कळताच त्यांच्या लाखो चाहत्यांनी त्यांनी यातून लवकर बरे व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
बच्चन यांचे दोन्ही बंगले 'सील'
बच्चन पिता-पुत्र कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांचे जलसा आणि प्रतीक्षा बंगला सील करण्यात आले आहे. आज (रविवारी) सकाळी पालिकेची टीम प्रथम अमिताभ बच्चन यांच्या जलसा या निवासस्थानी दाखल झाली. तेथे जलसा बंगल्याचे प्रथम, नंतर शेजारी असलेल्या अमिताभ बच्चन यांचे कार्यालय आणि प्रतिक्षा बंगल्याचेही निर्जंतुकीकरण (sanitization) करण्यात आले. तसेच बच्चन यांच्या जुहू येथील जलसा आणि प्रतिक्षा बंगल्याला पालिकेच्या के-पश्चिम विभागाने कंटेंटमेंट झोनची नोटीस लावली आहे.
यावेळी जलसा बंगल्यावर पालिकेच्या के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे स्वतः दाखल झाले. त्यांच्यासोबत वैद्यकीय पथक देखील जलसा बंगल्यात गेले. या बंगल्यात असलेल्या कर्मचारी वर्गाची देखील चाचणी करण्यात आली. काही वेळाने याबाबत पालिकेकडून अधिकृत माहिती मिळण्याची शक्यता आहे.
बच्चन कुटुंबीयांना पुढील काही दिवस बंगल्याबाहेर पडता येणार नाही. तर दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा सुरक्षा रक्षक पॉझिटिव्ह आल्याने त्यांचा बंगलाही सील करण्यात आला आहे. याआधी सिनेसृष्टीतील करण जोहर, अमीर खान यांच्या बंगल्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा - बच्चन पिता पुत्रांना कोरोनाची बाधा; प्रकृती स्थिर