मुंबई - दुचाकी डीलर्सकडून होत असलेल्या विक्रीचा गोरखधंदा पूर्व परिक्षेत्र वाहतूक पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. पूर्व उपनगरातील अनेक डीलर्स दुसऱ्याच्या नावे नोंद असलेल्या टीसी नंबरचा वापर करून अनेक गाड्या त्यांच्या नंबरने विकून सरकारी तिजोरीवर डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुंडलिक कानगुडे एपीआय सुभाष साबळे यांचे पथक विक्रोळी विभागाच्या हद्दीत वाहतूक नियंत्रण करीत होते. यावेळी घाटकोपर पूर्वकडील पोलिसांनी नो एन्ट्रीतून हीरो प्लेजर स्कूटीवरुन आलेल्या महिलेला अडवले. दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांनी गाडीचा नंबर तपासला असता त्यावरून तब्बल १ लाख २४ हजार ७०० रुपये दंड प्रलंबित असल्याचे आढळून आले. हे ऐकून ती महिला हादरली. तिने ८ दिवसापूर्वी ही दुचाकी खरेदी केली होती आणि या दिवसात कोणत्याही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे तिने सांगितले.
त्यामुळे वाहतूक पोलिसांनी महिलेची दुचाकी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता मे. अर्चना मोटर्स मालक महादेव कानेकर याने ही दुचाकी (एम. एच. झिरो. नंबर ३३७) विकल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी कानेकर याची चौकशी केल्यावर त्याने जानेवारी २००६ पासून या नंबरने ३३० दुचाकी विकल्याचे सांगितले. हा नंबर आरटीओकडून हिंदुस्तान को-ऑपरेटिव बँक या कंपनीला मिळालेला असून त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी कानेकर व अन्य डीलर्स केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात कानेकर व सब डीलर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.