मुंबई : इंडिया आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत होत असून, यासाठी विरोधी पक्षाने जोरात तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत ११ प्रमुख पक्षांच्या नेत्यांची विशेष समिती स्थापन केली जाणार आहे. या प्रसंगी इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. मुंबईतील आपल्या कार्यालयात ते बोलत होते.
विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती : याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीची अतिशय महत्त्वाची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, झारखंडचे मुख्यमंत्री, तसेच जम्मू-काश्मीरचे मोठे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर फार मोठी वैभवशाली अशी ही बैठक होणार आहे. बैठकीचा अजेंडा ठरवण्याचे काम सुरू आहे. या दोन दिवसीय बैठकीमध्ये इंडियाच्या लोगोचं अनावरण होणार आहे. ही आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. ही बैठक फार महत्त्वाची असल्याने संपूर्ण देशातून नेते या बैठकीला येणार आहेत. देशातीलच नाही तर विदेशातील मीडिया एजन्सीने या बैठकीच्या कव्हरेजसाठी आमच्याशी संपर्क केला आहे.
११ प्रमुख पक्षांच्या नेत्यांची समिती : इंडिया आघाडीच्या लोगोबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, या लोगोमध्ये या देशाचा, देशातील एकतेचा, स्वाभिमानाचा रंग असणार आहे. इंडिया आघाडीमध्ये ११ प्रमुख पक्षांच्या नेत्यांची समिती बनवण्यात येणार आहे. ही फार मोठी लढाई आहे. इंडिया जितेगा, भारत जितेगा या प्रकारची ही लढाई आहे. तसेच या बैठकीसाठी येणाऱ्यांचे स्वागत हे पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने करण्यात येणार आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आमची ही लढाई असल्याचेही संजय राऊत म्हणाले आहेत.
विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल : आमदारांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून दिरंगाई होत असल्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष यांना समजायला पाहिजे की, आपण कायद्याचे रक्षक आहोत. या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले आहे. त्या संविधानाप्रमाणे जे काम करत नाहीत, त्यांना जनता कचऱ्याप्रमाणे फेकून देते, असा इशाराही संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.
हेही वाचा -