नाशिक - जिल्ह्यातील मनमाडच्या नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने 'भारत बंद'ला पाठींबा देण्यासाठी बुधवारी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. या संपात शाळा आणि बँकादेखील सहभागी झाल्या होत्या. परंतु, मनमाड शहरातील बँका सुरूच होत्या, त्यामुळे त्याचा परिणाम ग्राहकांवर झाला नाही.
सांगली - जिल्ह्याच्या इस्लामपूर, तांबवे, बहे, शिरटे, रेठरे, हरणाक्ष, बोरगाव, ताकारी, करंजावडे, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द आदी अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तर ठिकठिकाणी रस्ता रोका आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. तसेच, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूरमध्ये मोटरसायकलवर फिरून व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करण्यास भाग पाडले. तसेच, ठिकठिकाणी सरकार विरोधी घोषणाही देण्यात आल्या.
अहमदनगर - आरसीईपी अर्थात प्रादेशिक व्यापक आर्थिक भागिदारी करार रद्द करावा. तसेच शेतकर्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करून त्यांना शेतीमध्ये सर्व पायाभूत सुविधा द्या अशा मागण्या करत स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी रास्ता रोको आंदोलन केले. शेवगावमध्ये भारत बंदच्या अनुषंगाने महारस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. तसेच जेएनयू मधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच कामगार, शेतकरी, सर्वसामान्य जनतेविरुद्धचे कायदे त्वरित रद्द करण्याची मागणी, एनआरसी, सीसीए, एनआरपी, आरसीईपी हे कायदे त्वरित रद्द करण्यात यावेत, आशा ग्रामपंचायत कर्मचारी त्यांना किमान वेतन देऊन शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, हमाल मापाडी यांना शासकीय सुख-सुविधा द्याव्यात इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी शेवगाव मधील क्रांती चौकात हा महारास्ता रोको करण्यात आला होता.
हिंगोली - जिल्ह्यात भारत बंदचा विशेष परिणाम दिसून आला नाही. भारत बंद दरम्यान 'आशा वर्कर संघटने'ने बंद पुकारत जिल्हा परिषद कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढला. एका संघटनेने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तर, आरोग्य विभागाची देखील अत्यावश्यक सेवा असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील संघटना बंद मध्ये सहभागी झाल्या नाहीत. शहरातही नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असल्याचे दिसून आले.
परभणी - ग्रामीण भारत बंद अंतर्गत परभणी देखील विविध कामगार संघटना तसेच शेतकरी संघटनांच्या वतीने बंद आणि विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गंगाखेड रोडवरील टोलनाक्याजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनस्थळी आलेल्या तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
जालना - जिल्ह्यातील भोकरदन येथील 'महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन'च्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपात सहभाग नोंदवला. यावेळी विविध मागण्यांसाठी सरकार विरोधात घोषणबाजी करण्यात आली. दरम्यान, भोकरदन तहसील कार्यालय, पंचायत समिती तसेच विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी राज्यव्यापी संपामध्ये सहभागी झाले होते. यामुळे, विविध कामासाठी कार्यालयात आलेल्या नागरिकांची कामे न झाल्यामुळे हिरमोड झाल्याचे बोलले जात आहे.
बुलडाणा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलडाणा-खामगाव रस्त्यावरील वरवंट फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारने कबुल केल्याप्रमाणे आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, वीज बिल माफ करावे, प्रादेशिक व्यापार आर्थिक भागिदारी करार (आरसीईपी) रद्द करावा या मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, सर्व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. तर, आंदोलनादरम्यान दोन्ही बाजूची वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती.
यवतमाळ - केंद्र व राज्य सरकारच्या कामगार व कर्मचारी विरोधातील धोरणांचा निषेध करण्यासाठी तसेच आपल्या विविध प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी जिल्ह्यातील दीड लाख कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. यामध्ये महसूल राज्य कर्मचारी संघटनासह २० संघटना या 'काम बंद' संपात सहभागी झाल्या होत्या. तसेच जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पेन्शनर्स व कामगार संघटनांचाही सहभाग होता.
हेही वाचा - देशव्यापी बंदला रत्नागिरीत संमिश्र प्रतिसाद; जिल्हा परिषदेसमोर सरकारी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी
हेही वाचा - नांदेडमध्ये देशव्यापी संपाला उस्फूर्त प्रतिसाद, शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट