मुंबई: राज्यातील भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाचा वाद आता चांगलाच गाजला असून या संदर्भात राज्याचे यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग असल्याचे अनेक दाखले पुराणातही आहेत. तसेच इतिहासातही आहेत आणि यासंदर्भात केंद्रीय मंत्रालयाने सुद्धा प्रमाणित केलेले आहे.
भीमाशंकर मंदिराचा वाद: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाच्या संदर्भात सध्या वाद सुरू आहे. आसाम सरकारने आपल्या जाहिरातीत भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा उल्लेख केल्याने वादाला तोंड फुटले आहे. यावरून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यासंदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेतात? असा सवाल विरोधकांकडून सातत्याने केला जातो आहे.
काय म्हणाले मुनगंटीवार: राज्याचे सांस्कृतिक आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भीमाशंकर मंदिरावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, वास्तविक महाराष्ट्रातील भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा दाखला इतिहासात अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. पुराणातही त्याचे दाखले आहेत. शंकराचार्यांनी सुद्धा या संदर्भातील दाखले दिलेले आहेत. तसेच केंद्र सरकारने 2021 मध्ये राज्यातील पर्यटन स्थळांच्या बाबतीत काढलेल्या परिपत्रकात अतिशय स्पष्टपणे भीमाशंकर येथील सहाव्या ज्योतिर्लिंगाचा उल्लेख केलेला आहे. तसेच केंद्र सरकारनेही काढलेल्या आपल्या परिपत्रकामध्ये देखो अपना देश या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे देशामध्ये ज्या ज्या ऐतिहासिक वास्तू आणि तीर्थक्षेत्र धर्मक्षेत्र आहेत त्यांची माहिती स्पष्टपणे दिली आहे. यामध्ये भीमाशंकर मंदिराचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे यापेक्षा वेगळ्या उल्लेखाची गरज नाही.
भीमाशंकर मंदिरावर आसामचा दावा?: मंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले की, आसामच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी आपली चर्चा झाली असून त्यांनी आसाम इथल्या भीमाशंकर बद्दल जाहिरात केली आहे. त्या जाहिरातीचा महाराष्ट्रातल्या भीमाशंकर अशी काहीही संबंध नाही. महाराष्ट्रातल्या भीमाशंकर बद्दल त्यांचा काहीही दावा नाही. केंद्र सरकारने जारी केलेल्या परिपत्रकातील ज्योतिर्लिंगांबद्दल आपला कुठलाही आक्षेप नाही, असे त्यांनी सांगितल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
मुनगंटीवारांची कॉंग्रेसवर टीका: ते पुढे म्हणाले की, आसाम सरकारने प्रसिद्ध दिलेली जाहिरात ही काँग्रेसच्या काळापासून सुरू आहे. तीच जाहिरात आम्ही पुन्हा प्रसारित केली आहे. त्यामुळे हे काँग्रेसचे पाप आहे.
राजकर्त्यांनी इतिहासाबद्दल बोलू नये: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटद्वारे सांगितले की, महाराष्ट्रातून अजून काय काय पळवणार? उद्योग पळवले आता धार्मिक स्थळे ही पळवणार का, असा सवाल केला होता. यावर मुनगंटीवार म्हणाले की, विरोधकांना टीका करण्यापलीकडे काही काम नाही. काहीतरी खोटे बोलून राजकारण करायचे हे त्यांचे काम आहे. वास्तविक असल्या धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तू अथवा क्षेत्राबद्दल राजकारण्यांनी बोलू नये. त्यातील इतिहास तज्ञ आणि अभ्यासकांनीच योग्य अभ्यास करून मांडलेली मते अधिक महत्त्वाची असतात, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.