मुंबई - काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी सहकार मंत्री विलास पाटील-उंडाळकर यांच्या निधनाने अत्यंत लोकप्रिय, अनुभवी व निष्ठावंत नेतृत्व हरपले आहे. अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
पक्षाची कधीही भरून न येणारी झाली हानी
विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना थोरात म्हणाले की, विलासकाकांनी 1962 मध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी सलग 35 वर्षे प्रतिनिधित्व केले. राज्याच्या मंत्रीमंडळात सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास अशा अनेक खात्यांची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली होती.
राजकारणासोबतच सहकार क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. रयत सहकारी साखर कारखान्याची त्यांनी स्थापना केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील अग्रणी बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ओळख निर्माण केली. अनेक सहकारी संस्थांच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्राची तसेच काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. विलासकाका पाटील उंडाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उंडाळकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे थोरात म्हणाले.
हेही वाचा - बाळासाहेब थोरात देणार प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा? मंत्री देशमुखांच्या नावाची चर्चा
हेही वाचा - काँग्रेसने दिलेल्या वेदनेतून मी अजूनही बाहेर आलेली नाही - साध्वी प्रज्ञासिंह