मुंबई - मी गोल्डमेडलिस्ट इंजिनियर आहे. माझ्या गावात मत्स्य तलाव होता. मंत्री झाल्यानंतर मी कोचीनला जाऊन कोर्स केला होता. माशांच्या समुद्रातल्याच काय तर गोड्या पाण्यातल्या जातीही माला तोंडपाठ आहेत. नितेश राणेंच्या वडिलांनी पदुम मंत्री म्हणून सुरू केलेले कार्यक्रम मी पूर्णत्वाला नेले आहेत, अशा शब्दात महादेव जानकरांनी आमदार नितेश राणेंना टोला लगावला आहे.
गेल्या पाच वर्षांत कोकणातील मच्छिमारांच्या प्रश्नांनी गंभीर स्वरूप घेतले आहे. ज्याला मासे आणि मच्छिमारी यातले काहीच कळत नाही, अशा व्यक्तीला मुख्यमंत्र्यांनी मत्स्यविकास खाते देऊन कोकणावर अन्याय केला’, असल्याचे सांगत आमदार नितेश राणे यांनी पशू, दुग्ध आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले होते.
‘कोकणातील पारंपरिक मच्छिमारांवर समुद्रात उडी घेऊन आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांचा राजीनामा घ्या, अन्यथा मत्स्य दुष्काळ तरी जाहीर करा’, अशी मागणी नितेश राणे यांनी अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान विधानसभेत केली होती. यालाच उत्तर देताना जानकर म्हणाले, मी गोल्डमेडलिस्ट इंजिनियर आहे. माझ्या गावात ब्रिटिशकालीन मत्स्य तलाव होता. मात्सपालन कसे करावे हे मला चांगले ठावूक आहे.