मुंबई - छातीत दुखत असल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबईतील ग्लोबल या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी (दि. 18 जुलै) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
रुग्णालयात दाखल
मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात टू डी इको चाचणी केली होती. त्यात त्यांना छातीत का दुखत आहे हे स्पष्ट झाले नव्हते. रविवारी पुन्हा त्यांच्या बरगाड्यांमध्ये दुखत असल्याने ग्लोबल या खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. रुग्णालय प्रशासनाने महापौरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. महापौरांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचार केल्यावर लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आक्रमक महापौर
शिवसेनेमधील आक्रमक नगरसेविका म्हणून किशोरी पेडणेकर या 2019 मध्ये मुंबईच्या महापौर झाल्या. महापौर पदावर विराजमान झाल्यापासून मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या सतत बैठका घेत आहेत. प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत. त्यांचा कार्यकाळ सुरू होऊन काही महिने होताच मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला. तेव्हापासून गेले दीड वर्षे रुग्णांना सोयी सुविधा देता याव्यात म्हणून महापौर सतत रुग्णालय, कोविड सेंटर आदी ठिकाणी भेटी देत देऊन आढावा घेत आहेत. रुग्णांना औषधे आणि इंजेक्शन जास्त किंमतीत दिली जातात अशी माहिती मिळाल्यावर त्यांनी संबंधित मेडिकल दुकानांवर जाऊन धाडी टाकल्या आहेत. परिचारीका असलेल्या पेडणेकर यांनी डॉक्टर,नर्सची कमतरता भासल्यास स्वतः परिचारिका म्हणून काम करू, असे आरोग्य कर्मचाऱ्यांना महापौरांनी आश्वाशीत केले होते. त्यांना एक वेळा कोरोनाची लागण झाली होती. शिवसेना आणि भाजपा युती तुटल्यावर भाजप रोखठोक उत्तर देण्याचे काम महापौरांनी केले आहे.
हेही वाचा - मुंबईत मुसळधार पावसादरम्यान 11 ठिकाणी दुर्घटना, 21 जणांचा मृत्यू