मुंबई - मानखुर्द मंडाला परिसरातील भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली होती. या गोदामात ज्वलनशील साहित्य भरलेले होते. येथील केमिकल, ऑइलने भरलेले सुमारे 500 ते 600 डबे फुटल्याने आग क्षणात पसरून आगडोंब उसळला. आगीची तीव्रता वाढून बाजूला असलेली काही गोदामे जळून खाक झाली. या आगीवर 21 तासांनी मिनिटांनी नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
ऑइलचे डबे फुटल्याने आग पसरली
मानखुर्द मंडाला परिसरातील भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग लेव्हल तीनची होती. ऑइलचे डबे फुटल्याने आग बाजूला पसरली. मानखुर्द पूर्वेला 'मंडाळा' भागात 'कुर्ला स्क्रॅप' परिसर आहे. याच परिसरातील सुमारे 4 एकर क्षेत्रफळाच्या शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे, दुकाने इत्यादी व्यवसायिक स्वरुपाची बांधकामे अनधिकृतपणे उभी राहिली आहेत. घाटकोपर मानखुर्द लिंक रोडपासून काही अंतरावर असलेल्या या झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात काळे तेल, साबण बनवण्याचे साहित्य, रद्दी, प्लास्टिक असे अनेक ज्वलनशील साहित्य असलेली गोदामे आहेत. त्यामुळे इथे सातत्याने आग लागण्याचे प्रकार घडत असतात. शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास येथील एका भंगार ठेवण्यात आलेल्या गोदामाला भीषण आग लागली. गोदामात केमिकल, ऑइलने भरलेले डबे होते. यातील 500 ते 600 डबे आगीनंतर फुटल्याने क्षणात ही आग पाच ते सात हजार चौरस फुटावर पसरली. आजूबाजूच्या गोदामात पसरून भडका उडाला. अग्निशामक दलाला माहिती मिळताच तात्काळ वॉटर टँकर, बंबाच्या 16 गाड्य़ांसह घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचे काम सुरु केले. या आगीत 15 ते 20 गोदामे जळून खाक झाली.
याआधीही लागली होती आग
या परिसरात भंगाराच्या गोदामांना, झोपडपट्ट्यांना यापूर्वी अनेकवेळा आगी लागल्या आहेत. दीड-दोन वर्षांपूर्वी आणि त्यानंतर मागील वर्षी जून महिन्यात येथील स्क्रॅप झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. जेव्हा आगी लागतात, तेव्हा प्रशासनाला खडबडून जाग आल्याप्रमाणे कारवाई केली जाते. अनेकवेळा पालिकेने येथील भंगाराचे गोदाम, झोपडपट्टी, दुकानांवर कारवाई केली आहे. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने पुन्हा गोदामे उभी राहून आग लागण्याच्या घटना घडत आहेत.
बस मार्ग वळवले
मानखुर्द मंडाला येथे भंगाराच्या गोदामाला आग लागल्यावर बाजूच्या गोदामांमध्ये आग पसरली. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या वाहनांना ये-जा करता यावी यासाठी रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याचा परिणाम बेस्टच्या बसेसवरही झाला. छेडानगर, शिवाजी नगर, मानखुर्द, नवी मुंबईत जाणा-या बसेस अमर महाल, चेंबूर नाका, व्हीएन पुरव मार्ग ते महाराष्ट्र नगर या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
एक जवान जखमी
आग विझवताना अग्निशामक केंद्र प्रमुख हरिश नाडकर 40 वर्षे हे जखमी झाले. त्यांना जवळच्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आल्याचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून कळवण्यात आले आहे.
हेही वाचा - टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना जामीन मंजूर