मुंबई Maratha Reservation Protest : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, म्हणून मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना एकत्र आणलं आहे. मराठ्यांना आरक्षण हवं असून ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभरात दौरे आणि सभा घेत आहेत. मनोज जरांगे पाटील आता मुंबईत देखील सभा घेत आहेत. मात्र, जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावर घेत असलेल्या सभांमुळे नेमका राजकीय फायदा कोणाला होईल, यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
मराठा समाज शिंदे सरकारला डोक्यावर घेईल : मनोज जरांगे पाटील यांच्या सभेमुळे सत्ताधारी पक्षांना फटका बसेल, अशाप्रकारे विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. हा हास्यास्पद असल्याचा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते संजू भोर पाटील यांनी लगावला आहे. तसेच शिंदे सरकारच्या वतीनं मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाच्या जुन्या असलेल्या दस्तऐवजाचे पुरावे शोधले जात आहेत. तर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या परवानगीमुळे शिंदे सरकारच्या बाजुनं न्यायालयातदेखील भक्कमपणानं बाजू मांडली जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण शिंदे सरकार देईल. त्यामुळे मराठा समाज शिंदे फडणवीस पवार सरकारला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासदेखील शिंदे गटाचे प्रवक्ते संजू भोर पाटील यांनी व्यक्त केला.
- शिंदे सरकार फसवत आहे : मराठा समाज, ओबीसी समाज आणि धनगर समाज यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार फसवत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. जरांगे पाटील यांना विरोध करणारे आणि पाठिंबा देणारे लोक कोण आहेत, हे राज्यातील जनतेला माहीत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण आहे, असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होत आहे. मात्र सध्याचं राजकारण पाहता थोडाफार फटका विरोधकांना बसेल, का हे येणारा काळचं ठरवेल - राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी
राज्यकर्त्यांनाच खरा धक्का बसेल : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांचं एकमेव नेतृत्व महाराष्ट्रात तयार झालेलं आहे. त्यांनी एक हाक दिल्यावर त्यांच्या सभेसाठो दोनशे एकरात लाखोच्या संख्येनं लोकं जमले. 25,25 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या. 200 एकरच्या शेतात सभा झाली. हा महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना धडा होता. राजकारणातील कुणालाच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं गांभीर्य आणि महत्त्व कळलेलं नसावं, असं त्या सगळ्यांकडं बघून वाटलं. आता जरांगे पाटील मुंबईत आल्यानंतर राजकीय नेत्यांना खरा धक्का बसेल, यात शंका नाही. मराठा समाजाला आरक्षण देणं ही शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे याचा सर्वात मोठा फटका सत्ताधारी पक्षांना बसणार असल्याचं राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :