मुंबई - एखादे काम करण्यासाठी आत्मविश्वास असावा लागतो. मात्र, ते काम आपण सहज करू शकतो असा अतिआत्मविश्वास झाल्यास त्या व्यक्तीचे मोठे नुकसान होते. असाच प्रकार काहीसा ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांच्यासोबत घडला आहे. कोटक यांना नगण्य समजण्याच्या अतिआत्मविश्वासामुळेच संजय दिना पाटील यांचा पराभव झाला.
मुंबईमधील उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सुब्रमण्यम स्वामी यांचा अपवाद सोडल्यास १९६७ पासून अद्याप कोणत्याही एका पक्षाचा खासदार सलग २ वेळा निवडून आलेला नाही. या मतदारसंघातून खासदार राहिलेले भाजपचे किरीट सोमय्या यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने सोमय्या यांना डावलून मनोज काटक यांना उमेदवारी देण्यात आली. कोटक यांना उमेदवारी मिळाल्यावर प्रचार करताना कोटक यांनी कुठेही कमी पडणार नाही अशी रणनीती केली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना आणून गुजराती मते आपल्याकडे वळवली. पंकजा मुंडे, महादेव जानकर यांना प्रचारात उतरवून मागासवर्गीय मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. प्रचार फेरी, सभा आदी ठिकाणी कोटक स्वत: उपस्थित राहत होते.
राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यावर संजय पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र, प्रचारफेऱ्या आणि सभांमध्ये पाटील बहुतके वेळा उपस्थित राहत नव्हते. पाटील उपस्थित नसल्याबाबत विचारणा केल्यावर ते इतर ठिकाणी मिटींगमध्ये असल्याचे सांगण्यात येत होते. अशा मिटिंग घेऊन आपली मते वाढवण्याच्या कामात ते व्यग्र असल्याचे सांगितले जात होते. उमेदवारी अर्ज भरताना भाजपला उमेदवार मिळत नाही, एका नगरसेवकाला उमेदवारी द्यावी लागली आहे. असे वक्तव्य केल्याने पाटील यांना आपण सहज जिंकू असा अतिआत्मविश्वास होता. मात्र, त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
या लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा क्षेत्रापैकी ५ आमदार भाजप शिवसेनेचे आहेत. त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीला आपला उमेदवार निवडून आणणे कठीण होणार आहे.
मनोज कोटक यांनी राष्ट्रवादीच्या संजय पाटील यांचा तब्बल २ लाख २६ हजार मतांनी पराभव केला. मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचा अपवाद सोडल्यास मुलुंड आणि घाटकोपर मधील मतदारांनी दिलेल्या एकगठ्ठा मतांमुळे मनोज कोटक यांना विजय मिळवणे सहज शक्य झाले. लोकसभेच्या निवडणुकीत ईशान्य मुंबईमधून भाजपचे मनोज कोटक यांना ५ लाख १३ हजार ८ मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या संजय पाटील यांना २ लाख ८६ हजार ४४९ मते मिळावी. कोटक यांनी पाटील यांचा २ लाख २६ हजार २९९ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात. या ६ मतदारसंघापैकी मानखुर्द शिवाजीनगर या एकाच मतदारसंघात संजय पाटील यांना जास्त मते मिळवता आली. या मतदारसंघात संजय पाटील यांना ७९ हजार ३६३ मते मिळाली तर मनोज कोटक यांना ३७ हजार ६९३ मते मिळाली. पाटील यांना या मतदारसंघात कोटक यांच्यापेक्षा ४१ हजार ६७० मते जास्त मिळाली.
मुलुंड येथे पाटील यांना ४० हजार ४९८ तर कोटक यांना १ लाख २७ हजार ७२२ मते मिळाली. कोटक यांना मुलुंडमध्ये ८७ हजार ३३४ मते जास्त मिळाली. विक्रोळीत पाटील यांना ४१ हजार ५०२ मते तर कोटक यांना ६९ हजार ६१८ मते मिळाली. या मतदारसंघात कोटक यांना पाटील यांच्यापेक्षा २८ हजार ११६ मते जास्त मिळाली. भांडुपमध्ये पाटील ५० हजार ३४६ तर कोटक यांना ९७ हजार २६९ मते जास्त मिळाली. भांडुपमध्ये कोटक यांना ४६ हजार ८६३ मते जास्त मिळाली. घाटकोपर पश्चिम येथे पाटील ४३ हजार ९५१ तर कोटक यांना ८६ हजार ३१७ मते मिळाली. घाटकोपर पश्चिम मधून कोटक यांना ४२ हजार ३६६ मते जास्त मिळाली. घाटकोपर पूर्व येथून पाटील ३० हजार २३१ तर कोटक यांना ९२ हजार २६९ मते मिळाली. घाटकोपर पूर्व येथून कोटक यांना ६३ हजार १३८ मते जास्त मिळाली.
ईव्हीएम मशीनमधील मत मोजणीमध्ये कोटक यांनी आघाडी घेतली ती पोस्टल मतांमध्येही कायम ठेवली. पोस्टल मतांमध्ये पाटील यांना ५४२ मते तर कोटक यांना ९०७ मते मिळाली. पोस्टल मतांमध्ये कोटक यांना ३६५ मते अधिक मिळाली. ईटीपीबीएस मतांमध्ये पाटील यांना १६ तर कोटक यांना ११३ मते मिळाली. कोटक यांना ईटीपीबीएस मतांमध्ये ९७ मते अधिक मिळाली. मतांची ही आकडेवारी पाहिल्यास भाजपच्या कोटक यांना घाटकोपर, मुलुंडमधील गुजराती तसेच विक्रोळी, भांडुप येथील मराठी व इतर भाषिक मतदारांनी मतदान केल्याने कोटक यांना विजय मिळवणे सोपे झाले.