मुंबई Manoj Jarange Patil : राज्यात सध्या आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. एकीकडं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात रान पेटवलं आहे. तर, दुसरीकडं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये, यासाठी ओबीसी समाज देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार असून, संपूर्ण राज्यातून भगवं वादळ मुंबईत धडाडणार आहे.
सरकारची डोकेदुखी वाढली : "गोळ्या घातल्या तरी चालेल, पण आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही", असा निर्वाणीचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. साधारण तीन कोटी मराठा समाज मुंबईत जमेल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. यामुळं सरकारची डोकेदुखी वाढली असून, पोलिसांवर देखील प्रचंड ताण येणार आहे. तसंच कायदा, सुव्यवस्थेच्या प्रश्न सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. याच दिवशी मुंबईत 'मुंबई फेस्टिवल' होत आहे.
मराठा विरुद्ध ओबीस आमनेसामने : याआधी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर त्यांनी राज्यभर दौरा केला होता. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळं आता मनोज जरांगे 20 जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहेत. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. दुसरीकडं ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय. तसंच 20 जानेवारी रोजी मुंबईत ओबीसी समाज देखील मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. मात्र, अद्याप सरकारनं त्यांना परवानगी दिलेली नाहीय. त्यामुळं मराठा विरुद्ध ओबीस समाज आमनेसामने आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
पोलिसांवरील ताण वाढणार? : 20 जानेवारी रोजी तीन कोटी मराठा समाज मुंबई दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता मराठासह ओबीसी समाज मुंबईत दाखल झाल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तसंच वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याच दिवशी मुंबई फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळं पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण येण्याची शक्यता आहे. दुसरीकडं पोलिसांवरील वाढता ताण पाहता, राज्य सरकार पोलिसांची कुमक बाहेरुन मागवणार का? हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -
- 'वंदे भारत'वरुन संभाजीनगर रेल्वे स्थानकावर 'महाभारत'; एकीकडं कार्यकर्ते भिडले, दुसरीकडं नेते चहापानात रमले
- रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, मविआ सरकारच्या काळात फोन टॅपिंग प्रकरणी सापडल्या होत्या वादात
- अयोध्येत विकासपर्व! मथुराचे लोक कलाकार करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार स्वागत, हजारो कोटींच्या प्रकल्पांचं करणार लोकार्पण