मुंबई Mahesh Tapase : गुजरात सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातील मुंबईत व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलं आहे. गुजरात राज्यात उद्योगधंद्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशानं ग्लोबल समिट आयोजन करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा कार्यक्रम असल्याचा विरोधकांकडून आरोप केला जात आहे. व्हायब्रंट गुजरात समिटबाबत राज्य सरकारचं मौन का? असा सवाल महेश तपासे यांनी सरकारला (Mahesh Tapase On Vibrant Gujarat Summit) विचारला आहे.
मुंबईला व्हायब्रंट गुजरात समिट आयोजित : राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर राज्यातील अनेक उद्योगधंदे परराज्यात गेल्यानं राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर (Mahesh Tapase On Shinde Fadnavis Government) विरोधकांकडून वारंवार टीका केली जात आहे. महाराष्ट्रातून गुजरात राज्यात उद्योजकांना आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी गुजरात सरकारच्या वतीनं मुंबईला व्हायब्रंट गुजरात समिट आयोजित करण्यात आली आहे. तर गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार अपयशी झालं आहे, असं मत महेश तपासे यांनी व्यक्त केलं आहे.
अपयश शिंदे सरकारचं : ज्या पद्धतीने व्हायब्रंट गुजरात कार्यक्रम महाराष्ट्रात आयोजित केला आहे, त्याप्रकारे मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम गुजरातमध्ये घेणार का? तसंच गुजरातमध्ये गेलेले उद्योग महाराष्ट्रात परत येणार का? महाराष्ट्रातील उद्योग बाहेरच्या राज्यात जाऊ नये यासाठी आपण काय उपाययोजना केल्या आहेत. महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना रोजगारासाठी काय उपाययोजना केल्या आहेत? याबाबतचं स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं असं आवाहन महेश तपास यांनी केलं आहे. व्हायब्रंट गुजरातच्या माध्यमातून मुंबईतले उद्योग धंदे गुजरातला जर गेले तर पूर्ण अपयश हे शिंदे सरकारचं असणार आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -