मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. महाविकासआघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी अनेक नव्या घोषणा केल्या आहेत. ग्रामीण भागासाठी गाव तिथे एसटी या योजनेअंतर्गत 1600 नव्या बस विकत घेण्याची तरतूद करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे एसटीचे जाळे आता गावोगावी पोहचणार आहे. तसेच बसस्थानकांच्या निर्मितीसाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा- जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं आव्हानात्मक; सर्वसमावेशक अर्थसंकल्पासाठी प्रयत्न
ग्रामीण भागात आजही वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिसांठी गाव तिथे एसटी या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या बस सेवेचा फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत 1600 नव्या एसटी बस विकत घेतल्या जातील. त्यासाठी 500 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार असून बस स्थानकांसाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या बरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक वेळेनुसार बसचे वेळापत्रक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण भागात गावोगावी बस पोहोचावी म्हणून मीनी बस खरेदी करण्यात येणार असून त्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये वायफाय युक्त बस प्रवासीमार्गावर धावतील असेही अर्थमंत्री पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले.