मुंबई : रविवारी दुपारी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला. शिंदे फडणवीस सरकारमधील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासह महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. सध्या भाजपचे देवेंद्र फडणवीस हे शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. आता त्यांच्यासह अजित पवार देखील उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये काम करणार आहेत. विशेष म्हणजे अजित पवारांनी 3 वर्षांत तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शिंदे सरकारमध्ये प्रथमच महिला मंत्री : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आदिती तटकरेंच्या रुपात शिंदे सरकारमध्ये प्रथमच महिला मंत्र्यांचा समावेश झाला आहे. यासह जेष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवारांचे खंदे समर्थक धनंजय मुंडे तसेच ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेले हसन मुश्रीफ यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा नाही : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या या शपथविधीला पाठिंबा दिलेला नाही. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे या शपथविधीला उपस्थित नव्हते.
अजित पवारांना 30 ते 40 आमदारांचा पाठिंबा? : अजित पवारांना सध्या राष्ट्रवादीच्या 30 ते 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पक्ष प्रतोद व विधानसभा उपाध्यक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता ते देखील एकनाथ शिंदेंप्रमाणे पक्षावर दावा ठोकतील का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसा दावा ठोकला तर पक्ष त्यांचाच होईल, असे देखील बोलले जात आहे. शपथविधीनंतर बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये प्रवेश केला आहे. आम्ही आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या चिन्हावरंच लढवू असे ते म्हणाले आहेत.
हेही वाचा :