मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र अव्हाड यांची विरोधी पक्ष नेते पदी निवड करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत पुण्यात घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा उभी फूट पडली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 आमदार भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सामील झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यामध्ये अजित पवार यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहेय पहाटेचा शपथविधी यशस्वी झाल्यानंतर अजित पवार यांनी आता अचानक दुपारी शपथविधी करून राज्यातल्या जनतेला आणि स्वतःच्या पक्षालाही जोरदार धक्का दिला आहे. अजित पवार यांच्या नाराजीचा फटका अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. पक्षांमध्ये नाराज होते अजित पवार यांचे निर्णय डावलले जात होते म्हणूनच अखेर अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपाशी संधान बांधून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राष्ट्रवादी काँग्रेस वरच दावा सांगितला आहे.
40 आमदारांसह बंडखोरी : अजित पवार यांनी आज भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याशिवाय आठ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा ठोकला आहे. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेला वर्षभरानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा ठोकला आहे. 2024 ची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याशिवाय आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, भाजपसोबत का नाही? असेही अजित पवार म्हणाले.
निवडणुका घड्याळाच्या चिन्हावर लढवणार : वरिष्ठांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. अजित पवारांच्या या निर्णयाला शरद पवार समर्थन नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यातील सर्व निवडणुका घड्याळाच्या चिन्हावर लढवल्या जातील असेही अजित पवार म्हणाले. राज्याचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सत्तेत आलो आहोत. आम्ही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवू. नागालँडमध्ये निवडणुका आहेत, जिथे पक्षाने भाजपशी हातमिळवणी केली आहे. काही जण आरोप करतील, साडेतीन वर्षांपूर्वी निर्णय झाला होता.
वर्धापनदिनी स्पष्ट भूमिका : देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. वर्धापनदिनी मी स्पष्ट भूमिका मांडली होती. तरुणांना संधी देणे गरजेचे आहे. नवीन कार्यकर्ते पुढे आणले पाहिजेत, मी करत राहीन. कोरोना असला तरी विकास ही आमची भूमिका होती. आम्हाला कामाची काळजी आहे. केंद्राचा निधी राज्याला कसा मिळेल याबाबत पुढाकार घेऊ. हा निर्णय घेताना बहुतांश आमदार या निर्णयाशी सहमत असल्याचे अजित पवार म्हणाले.