मुंबई : अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तशा आशयाचं पत्र निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलं आहे. शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन हटवत अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड केल्याचा ठराव पक्षाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केल्याचे या पत्रात नमूद आहे. यामुळे आता अजित पवार यांनी संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेसवर दावा केल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजित पवारांचा बहुसंख्य आमदारांच्या पाठिंब्याचा दावा : अजित पवार यांच्या या दाव्यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार यांनी 5 जुलै म्हणजे आज दाखल केल्याची माहिती आहे. मात्र त्यांनी बंडाच्या दोन दिवसांपूर्वीच म्हणजे 30 जूनलाच निवडणूक आयोगाला हा ई-मेल प्राप्त झाला होता. या पत्राद्वारे त्यांनी पक्षावर दावा केला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना पक्षातील बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही केला आहे. निवडणूक आयोग येत्या काही दिवसांत याचिकांवर प्रक्रिया करेल आणि दोन्ही पक्षांना त्यांच्यासमोर ठेवलेल्या संबंधित कागदपत्रांची पूर्तता आणि छाननी करण्यास सांगेल.
राष्ट्रवादीतही शिवसेनेप्रमाणे स्थिती निर्माण : निवडणूक आयोगाने आमची बाजू ऐकल्याशिवाय राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. तसेच बंडखोर 9 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. या सर्व प्रकाराकडे पाहता राष्ट्रवादीतही शिवसेना फुटीनंतरची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
आयोगाला एकतर्फी निर्णय घेता येणार नाही : राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार यांनी आता पक्षावर दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे. दोन दिवसांपूर्वीच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानेही निवडणूक आयोगात अर्ज दाखल केला होता. शरद पवारांनी दाखल केलेल्या अर्जानुसार आयोगाला पक्ष आणि चिन्हाबाबत एकतर्फी निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी त्यांना आधी शरद पवार यांच्या गटाची बाजू ऐकून घ्यावी लागणार आहे. तसेच अजित पवार यांनाही त्याच्याकडे किती आमदार आणि खासदार आहेत याची माहितीही आयोगाला द्यावी लागणार आहे.
हेही वाचा :