मुंबई - शिक्षणाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्यांच्या मुलींवर आत्महत्या करण्याची वेळ येते, यासरखे दुसरे दुर्दैव नाही. मात्र, आंधळ्या आणि बहिऱ्या सरकारला या शेतकरी आईबापाचा टाहो ऐकू जात नसल्याचे म्हणत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला. शेतकऱ्याला खड्याप्रमाणे बाजूला सारणाऱ्या भाजप सरकारच्या पापाचा घडा भरला असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.
शिक्षणाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने हतबल होऊन एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार मोहोळ तालुक्यातील देगाव (वा.) येथे घडला. रुपाली रामकृष्ण पवार असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेमुळे मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुनच काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.
सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात फी भरण्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याच्या मुलीवर आत्महत्या करण्याची वेळ येते यासारखे दुर्देव नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.