मुंबई - विधानसभा निवडणूक २०१९ चे सर्व निकाल हाती आले आहेत. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसला जागा मिळाल्या आहेत. प्रत्येक निवडणूक झाली की चर्चा होते ती, कोण सर्वाधीक मतांनी विजयी झाले त्याची. या विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून सर्वांत जास्त मताधिक्याने निवडून आले आहेत.
सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये युतीच्या जरी सर्वात जास्त जागा असल्या तरी आघाडीने मारलेली मुसंडी लक्षणीय आहे. या निवडणुकीत काही उमेदवारांनी जास्त मतांनी निवडून येण्याचा विक्रम केला आहे.
सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले उमेदवार
१) अजित अनंतराव पवार - १ लाख ६५ हजार २६५
राष्ट्रवादीचे बारामती मतदारसंघाचे उमेदवार अजित पवार हे राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी १ लाख ६५ हजार मतांनी भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला.
२) विश्वजीत पतंगराव कदम - १ लाख ६२ हजार ५५१
पलूस-कडेगाव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम हे राज्यातून दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत. त्यांनी १ लाख ६२ हजार ५५१ मतांनी शिवसेनेच्या संजय विभुतेंचा पराभव केला.
३) धीरज विलासराव देशमुख - १ लाख २१ हजार ४८२
दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख हे प्रथमच विधानसभेच्या रणांगणात उतरले होते. त्यांनी लातून ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये ते विक्रमी मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सचिन देशमुखांचा तब्बल १ लाख २१ हजार ४८२ मतांनी पराभव केला आहे.
४) अशोक शंकरराव चव्हाण - ९७ हजार ४४५
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी ९७ हजार ४४५ मतांनी भाजपचे उमेदवार श्रीनिवास गोरठेकर यांचा पराभव केला. त्यांनी राज्यात चौथ्या क्रमांकाची विक्रमी मते घेतली. अशोक चव्हाणांसाठी हा विजय अत्यंत दिलासादायक मानला जात आहे. २०१९ च्या लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता.
५) प्रशांत ठाकूर - ९२ हजार ७३०
पनवेल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रशांत ठाकूर हे विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी राज्यात क्रमांक पाचची मते घेतली आहे. त्यांनी शेकापच्या हरीश केनी यांचा ९२ हजार ७३० मतांनी पराभव केला.
सर्वात जास्त मतांनी निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये ४ उमेदवार हे आघाडीचे आहेत. तर १ जण भाजपचा आहे.