मुंबई - हिवाळ्यातील गुलाबी थंडी, सकाळ, सायंकाळ अनेकदा पडणारे धुके, थंडगार वाहणारे वारे याची अनेकांना भुरळ पडत असते. हिवाळा हा ऋतू अनेकांच्या अवाडीचा असतो. मात्र, याच ऋतूच्या काळात अनेक जुने आजारही उद्भवतात. त्यामुळे, हिवाळा ऋतू अनेकांसाठी स्वागताचा आणि अत्यंत आनंदाचा असला तरी तो याच दरम्यान उद्भवणाऱ्या आजारामुळे अनेकांसाठी त्रासदायक ठरतो. त्यामुळे, याकाळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि आपला आहार कसा संतुलित ठेवावा याविषयी मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
राज्यातच नव्हे तर देशभरात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. या थंडीमध्ये आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. विशेषतः लहान मुले आणि रुग्णांना या ऋतूचा त्रास होत असतो. थंडीमुळे सर्दी खोकला आणि विशेषत: व्हायरल फीवर हे सर्वाधिक होताना दिसतात. त्यामुळे, श्वसन संस्थेच्या आजारामुळे निमोनिया वाढतो. त्यामुळे बरेचदा रुग्णाच्या अडचणीत भर पडत असते. थंडीच्या काळात तसे सर्वत्र दिसत नसले तरीसुद्धा मलेरिया, डेंगू, लेप्टोस्पायरोसिस याचेसुद्धा प्रमाण आढळून येत असते. याच काळात त्वचेचे आजारसुद्धा अधिक बळावत असतात. त्यामुळे, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले.
हिवाळ्यात ज्यांना अगोदरच शुगरचे आजार आहेत किंवा श्वसनसंस्थेचे आजार आहेत त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत असतो. त्यामुळे, सर्दी झाल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांना दाखवून घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. ताप आणि खोकला या छोट्याशा आजारांकडे दुर्लक्ष केल्याने त्याचे परिणाम जास्त होतात. थंडीच्या दिवसात बऱ्याच ठिकाणी अनेक कुटुंब बाहेर फिरण्यासाठी जातात. यावेळी प्रकृतीची काळजी घेत सोबत उबदार कपडे ठेवणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉ. गायकवाड यांनी दिला.
सर्दी-खोकला झालेला असेल त्यावेळी सोबत पॅरासिटॅमॉल अथवा इतर तत्सम औषध ठेवले तरी चालू शकते. किंवा त्यासोबत गरम पाण्याची वाफ घेणेसुद्धा चांगले असते. या काळामध्ये सर्वच नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घेत असताना उबदार कपडे वापरणे किंवा शरीराला ऊर्जा मिळेल, अशा प्रकारचे अन्नधान्य, कडधान्य खाणे आवश्यक आहे. छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास थंडीच्या दिवसात निर्माण होणाऱ्या आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. थंडीच्या दिवसात निर्माण होणाऱ्या आजारांपासून आपण आपल्या कुटुंबाला दूर ठेवू शकतो. मात्र, त्यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा- राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध स्तरातून अभिवादन