मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच मुंबईतील नायगाव आणि मरोळ येथील पोलीस ग्राउंडवर पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणी सुरुवात झालेली आहे. मागील पोलीस भरतीदरम्यान हिंगोली आणि मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराच्या शारीरिक चाचणी दरम्यान अचानक मृत्यू झाला होता. त्यामुळे शारीरिक चाचणीला जाण्यापूर्वी काय काय तयारी करावी आणि आहार पद्धतीत काय बदल करावा याबाबत केईएम रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी मार्गदर्शन केले आहे.
शारिरीक चाचणीपूर्वी घ्यावी काळजी : डॉ. शुभांगी पारकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीला जाण्यापूर्वी घरातील सौम्य आहार हा चाचणी अगोदर घ्यावा. तसेच अतिउत्साही होऊन शारीरिक चाचणी देऊ नका. मन शांत प्रसन्न ठेवून शारीरिक चाचणीला सामोरे जा. जेणेकरून डिप्रेशनमध्ये न जाता उत्साहात तुम्ही तुमची चाचणी देऊ शकाल. शारीरिक चाचणी अगोदर तज्ञांकडून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक चाचणीसाठी जे प्रकार विचारणार आहेत त्याबाबत सराव करून घेणे देखील महत्त्वाचे आहे. पाणी प्यावे तसेच सकस आहार असावा. स्वतःची पूर्ण काळजी घ्या. ही केवळ परीक्षा आहे त्यामुळे सर सलामत तो पगडी पचास, असा पोलीस भरतीसाठी उतरलेल्या उमेदवारांसाठी डॉक्टर शुभांगी पारकर यांनी सल्ला दिला आहे.
कशी आहे शारीरिक चाचणी : पुरुषांना दोन शर्यतींमध्ये भाग घ्यायचा आहे, एक म्हणजे 1600 मीटर आणि दुसरी म्हणजे 100 मीटर आणि त्याचबरोबर गोळा फेक चाचणी घेतली जाईल. त्याचप्रमाणे महिलांना गोळाफेक व्यतिरिक्त 800 मीटर आणि 100 मीटर चाचणीत भाग घ्यायचा आहे. मुंबई पोलिसांच्या बहुतांश सशस्त्र विभाग कार्यलयाजवळ मैदाने आहेत. नायगाव, मरोळ येथे ही मैदाने आहेत. मात्र, दोनशे, 400 मीटरच्या या मैदानांमध्ये 1600 मीटर धावणे अडचणीचे ठरणार असून अनेक फेऱ्या ठेवल्या तरी उमेदवार खूप असल्याने बराच कालावधी या प्रक्रियेसाठी वाया जाऊ शकतो. त्यामुळे मुंबई पोलिसांनी इतर मैदानांचा शोध सुरु केला आहे. सात लाखांपेक्षा अधिक उमदेवारांची मैदानी चाचणी वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.
पोलीस भरती दरम्यान झालेले मृत्यू : महाराष्ट्र पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेदरम्यान विक्रोळीत शारिरीक चाचणीसाठी धावताना धाप लागून पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला तर आणखी एकजण जखमी झाला होता. तसेच नवी मुंबईतही भरतीसाठी आलेल्या तरुणाचा डेंग्यू तापाने मृत्यू झाला होता. २०१४ मध्ये भरतीदरम्यान मालेगावहून मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या अंबादास सोनावणे (वय २७) याचा चाचणीदरम्यान मृत्यू झाला होता. मैदानी चाचणीत चार कि.मी.चे अंतर धावल्यानंतर अंबादास कोसळला होता. त्याला सायन रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
तरूणांना जीव गमवावा लागला : ठाणे ग्रामीण पोलिस भरतीसाठी आलेल्या साईप्रसाद माळी याला भरतीदरम्यान चक्कर आली. त्याला वाशीतील रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यालाही डेंग्यू झाला होता, असे डॉक्टरांनी सांगितले होते. विक्रोळी ते घाटकोपर येथील पूर्वदृतगती मार्गावर पोलीस भरतीची चाचणी सुरू होती. अंबादासला सकाळी दहाच्या सुमारास चार किलोमीटरचे अंतर त्याने कापले. मात्र त्यानंतर तो खाली कोसळला. आणि त्याची शुद्ध हरपली. पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी उष्माघाताचा अंदाज व्यक्त केला होता. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. ऐरोली येथील भरतीसाठी जळगाव येथून साईप्रसाद माळी (वय १९) हा तरुण तेथे आला होता. मैदानी चाचणीदरम्यान माळी याला भरती प्रक्रियेच्या मैदानावरच चक्कर आली होती.
धावताना आली भोवळ : ११ वर्षांपूर्वी हिंगोलीत पोलिस दलाच्या भरतीदरम्यान शारीरिक चाचणीमध्ये धावत असताना भोवळ येऊन पडल्याने हिंगोली तालुक्यातील धोतरा येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हिंगोली पोलिस दलातील भरतीमध्ये हिंगोली-नर्सीदरम्यान 5 कि.मी. धावण्याची चाचणी होती. 350 उमदेवार या चाचणीत सहभागी होते. कांतीलाल (चेस्ट नंबर 1647) व नवनाथ हे दोघे धावत होते. दरम्यान, रक्तदाब वाढल्याने भोवळ येऊन ते कोसळले होते.
चेंगराचेंगरीमुळे देखील मृत्यू : २०१० मध्ये मुंबईतल्या कलिना ग्राउंडवर पोलीस भरतीदरम्यान चेंगराचेंगरी होऊन एकाचा मृत्यू झाला होता. तर ११ जण जखमी झाले होते. रात्रभर बाहेर ताटकळणा-या तरुणांनी, सकाळी गेट उघडल्यानंतर कसलीही पर्वा न करता आत धाव ठोकली आणि तीच एकाच्या जिवावर बेतली होती. यामुळे पोलिस भरतीच्या शारिरीक चाचणीसाठी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.