मुंबई Lok Sabha Elections 2024 : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून महिना-दोन महिन्याच्या कालावधीमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी राज्यातील सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात भाजपाने यंदा पूर्ण ताकद लावली आहे. लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू केले आहेत. (BJP Preparations for Lok Sabha)
पिछेहाट रोखण्यासाठी ताकद पणाला : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या त्रिकुटाने पूर्ण विदर्भ पिंजून काढायचं ठरवलं आहे. मागच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत विदर्भात झालेली पिछेहाट भरून काढण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी भाजपाने देशभर तयारी सुरू केली असून राज्यातही सर्व मतदारसंघांमध्ये भाजपाने आढावा घेतला आहे.
मागे झालेल्या चुकांवर लक्ष : विदर्भात भाजपाची कमी झालेली ताकद पुन्हा वाढवण्यासाठी यंदा भाजपा विशेष लक्ष देत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विदर्भात भाजपाला १५ जागांचा तोटा झाला होता. तर विदर्भात काँग्रेसची ताकद वाढली होती. २०१४ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये २०१९ मध्ये काँग्रेसच्या सहा जागा वाढल्या. या कारणामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडून कानउघाडणीसुद्धा करण्यात आली होती; परंतु मागे झालेल्या चुकांवर लक्ष देत भाजपाने आता बारकाईने विदर्भातील प्रत्येक मतदारसंघांचा आढावा घेतला असून त्या दृष्टीने तयारी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे, जागा वाटपामध्ये आता भाजपा आपला मित्र पक्ष असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गट यांना विदर्भात किती जागा देते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यवतमाळ-वाशिम, मतदार संघाचा प्रश्न : विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली या लोकसभा मतदार संघात भाजपाचे खासदार असून यवतमाळ-वाशिम, बुलडाणा या लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार आहेत. तर अमरावतीत नवनीत राणा या अपक्ष खासदार असून यंदा भाजपाकडून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर चंद्रपूर हा एकमेव लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असून खासदार सुरेश धानोरकर यांच्या निधनानंतर अद्याप या ठिकाणी पोटनिवडणूक न झाल्यानं आता थेट २०२४ च्या लोकसभेला या मतदारसंघातून निवडणूक होण्याची शक्यता आहे.
भावना गवळींना डच्चू मिळण्याची शक्यता : एकंदरीत पाहिले तर यवतमाळ-वाशिम येथील खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटात प्रवेश केला असला तरी सध्या भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी देणे शक्य दिसत नाही. तर दुसरीकडे बुलडाण्यातून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरू शकतात. विदर्भात काँग्रेसची ताकद वाढत असताना काँग्रेसमधील अंतर्गत कुरघोडी याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे.
विदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्त्वाची : काँग्रेससाठी विदर्भ हा नेहमीच अनुकूल राहिला आहे. याच विदर्भातून प्रभा राव, माणिकराव ठाकरे तसंच आताचे नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नेतृत्व सिद्ध करण्यासाठी ही एक मोठी संधी आहे. यासाठी त्यांना विदर्भातीलच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत निकराने हा लढावं लागणार आहे. त्याच सोबत चंद्रपूर, बुलडाणा आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचं ठरवलं आहे. विदर्भात वंचित बहुजन आघाडीची मोठी साथ ही महायुतीला भेटल्यास भाजपाला याचा मोठा फटका बसू शकतो. काँग्रेसला विदर्भात वंचित बहुजन आघाडीची साथ लाभल्यास लोकसभेतच नाही तर विधानसभेचं गणितसुद्धा बदलून जाऊ शकतं. योग्य उमेदवाराची निवड यासाठी फार महत्त्वाची ठरणार आहे.
या बाबींमुळे भाजपाला तोटा : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक प्रमुख मुद्दा आहेच. त्याचसोबत विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे होणारे सरकारचे दुर्लक्ष, संत्रा, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर सातत्याने होणारा अन्याय आणि त्यातून वाढत जाणारी त्यांची नाराजी, सिंचनासोबत अनेक क्षेत्रातील वाढत जाणारा अनुशेष, अनेक वर्षांपासून जवळ जवळ बंद पडलेली वैधानिक विकास महामंडळे या सर्व गोष्टींचा फटका विद्यमान सरकारला बसू शकतो. अशातच भाजपामध्येसुद्धा असलेले कुरघोडीचे राजकारण, महामंडळावरील रखडलेल्या नियुक्त्या, विदर्भातील प्रमुख नेत्यांना मंत्रिपदातून डावलने या सर्व बाबींचा रोषसुद्धा भाजपाला सहन करावा लागू शकतो.
विदर्भातील सर्वच्या सर्व जागा जिंकणार विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाला नेत्रदीपक विजय मिळेल, असा विश्वास भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. आम्ही विदर्भातील सर्वच्या सर्व मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकू हा आत्मविश्वास आहे. गेल्यावेळी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आमचा पराभव झाला होता; परंतु यावेळी चंद्रपूरसह विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघात भाजपाचा विजयाचा झेंडा फडकेल. यासाठी संपूर्ण योजना बूथ स्तरापासून तयार केली गेली आहे. संपूर्ण मतदारसंघांमध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व आणि विदर्भाचा विकास ज्या नेत्यांनी केला ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वामध्ये विदर्भाची जनता भाजपाच्या पाठीशी उभी आहे. म्हणून आम्ही विदर्भातील सर्व जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही शिवराय कुलकर्णी यांनी याप्रसंगी व्यक्त केला आहे.
हेही वाचा: