मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये काँग्रेसकडून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, प्रियांका गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, मल्लीकर्जून खर्गे, गुलाब नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, शत्रुघ्न सिन्हा, अशोक गहलोत या केंद्रीय नेत्यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे हे नेते २१ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील प्रमुख शहरे आणि महत्त्वाच्या मतदार संघांमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. तर राहुल गांधी, प्रियांका गांधी, शत्रुघ्न सिन्हा, सचिन पायलट यांचे प्रमुख शहरांमध्ये रोड शो आयोजीत करण्याची तयारी प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आली आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची महाआघाडी असल्याने अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या संयुक्त सभाही आयोजित करण्यात येणार असून त्यासाठीचे नियोजन पूर्ण झाले आहे.
हेही वाचा - राहुल गांधींच्या जवळ असल्याने मला संपवण्याचा कट केला जातेय- संजय निरुपम
शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या ४० प्रचारकांच्या यादीत काँग्रेसकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव, रजनी पाटील, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ट पत्रकार मधुकर भावे, ज्येष्ठ नेते नाना पटोले, नितीन राऊत, माणिकराव ठाकरे, एकनाथ गायकवाड, सचिन सावंत, हुसेन दलवाई, नसीम खान, बसवराज पाटील मुरूमकर, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमर राजूरकर, सुष्मिता देव, कुमार केतकर, चारुलता टोकस, मुकुल वासनिक, अविनाश पांडे यांचा समावेश आहे. उदित राज, आर.सी. कुंटीया, नगमा मोराजी, अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, ज्येष्ठ नेते व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे नेतेही राज्यात प्रचाराला येणार आहेत.