मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निश्चित असल्याचे सांगितले आहे. राज्यातील मंत्रिमंडळामध्ये रिपाइंला १ जागा व ४० ते ५० कार्यकर्त्यांना २ महिन्यात महामंडळावर वर्णी लावू, असे आश्वासनही देण्यात आले आहे. त्यामुळे कोठेही लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ सायन येथील मानव विकास केंद्रात बीआर शेट्टी संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी आठवले बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, की रिपाइं कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेना उमेदवारांच्या ४८ मतदारसंघात प्रचारात सहभागी व्हावे आणि मोठ्या प्रमाणात भाजप-शिवसेनेचा प्रचार करावा. तसेच युतीचे सरकार स्थापन करण्यात सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
माझा कधीही दक्षिण मुंबई आणि ईशान्य मुंबईतील जागेवर लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न नव्हता. कार्यकर्त्यांची इच्छा होती की, २ लोकसभेच्या जागा राज्यात निवडून आल्या तर रिपाइं आठवले पक्षाला चिन्ह आणि मान्यता प्राप्त होईल. आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, की ईशान्य मुंबईतील भाजप आणि शिवसेना किरीट सोमय्या वाद हा काही मोठा नाही. रिपाइं कार्यकर्त्यांनी ईशान्य मुंबईतील भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करावा आणि भाजपची जागा निवडून आणावे. रिपाइं कार्यकर्त्यानी गोंधळात न राहता शिवसेना भाजप उमेदवारांचे काम करावे, असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले.