मुंबई - राज्यात सत्तेत येऊन आज महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसवर टीका केली. आरे कारशेड प्रकरण, कंगना रणौत आणि अर्णब गोस्वामी प्रकरणात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरूही ठाकरे सरकार आणि मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
संंजय राऊतांचे वागणे खासदारकीला अनुकूल नाही-
फडणवीस म्हणाले, 'कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी यांच्या प्रत्येक विधानाशी आम्ही सहमत नाही. मात्र, आता त्या प्रकरणात न्यायालयानेच निकाल दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी न्यायालयास अपमानकारक म्हणू नये. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने राज्य सरकारला योग्य उत्तर दिले आहे. कंगना रनौत प्रकरणात कोर्टाने बीएमसी आणि राज्य सरकारला बजावले आहे. चुकीच्या मार्गाने सरकारी एजन्सीचा वापर केला असून संजय राऊत यांचे वागणे कोणत्याही खासदाराला अनुकूल नाही, असे कोर्टाने स्पष्टपणे सांगितले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अर्णब प्रकरणात कोर्टाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात सरकार किंवा गृहमंत्री माफी मागतील का? असा सवालही फडणवीस यांनी यावेळी केला. राज्य सरकारला अजून एक वर्ष आहे, पण या सरकारने कोणतेही चांगले काम केले का? असेही ते म्हणाले.'
कोरोना हाताळण्यात सरकार अपयशी-
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरे मेट्रो कारशेडच्या बाबतीत हे दिसून आले. या एका वर्षात केवळ तहकूब करणे ही सरकारची कामगिरी आहे. या सरकारमुळे मेट्रो जनतेपासून दूर आहे. कोरोना साथीला हाताळण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोरोनामुळे लोकांना त्रास होत असल्याचे आम्ही पाहिले आहे. ऑक्सिजनशिवाय आणि उपचार न करता लोक मरत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
तसेच कोरोना काळात खूप भ्रष्टाचार झाला आहे. कोरोना कालावधीत या सरकारने कोणतेही पॅकेज किंवा मदत पुरविली नव्हती. मी कोविडशी संबंधित 100 हून अधिक सल्ले दिले, पण सरकारने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोपी ही फडणवीस यांनी यावेळी केला.