मुंबई : Lathicharge in Jalna : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज उपोषणाला बसला होता. उपोषणाला बसलेल्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज (Lathicharge in Jalna) केल्यामुळे उपोषणकर्त्यांनी दगडफेक केली. यानंतर आता आज बीड, लातूर, धाराशिव आणि परभणीत बंद पुकारण्यात आला आहे. मुंबई आणि नाशिकमध्ये मराठा संघटनांनी तातडीच्या बैठका बोलावल्या आहेत. या आंदोलनाचा महामार्गावरील आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारच या प्रकरणात दोषी आहे. त्यामुळे ते कोणावर कारवाई करणार हा प्रश्नच आहे, असे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश : जालना येथील लाठीचार्ज प्रकरणावरुन (Lathicharge on Maratha Protester) संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीमध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, सरकारच दोषी आहे. राज्य कोणाचं आहे? गृह खात कोणाकडे आहे? विरोधी पक्षांकडे पोलीस खाते आहे का? विरोधी पक्ष पोलिस खाते चालवत आहे का? असे अनेक सवाल संजय राऊत यांनी विचारले.
मराठा समाजावर हल्ले का केले : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आमच्या काळात असे मोर्चे निघाले, मात्र असे लाठीचार्ज कधीही केले नाहीत. स्वतः मुख्यमंत्री त्या समितीमध्ये होते. अजित पवार होते. त्यांना मराठा समाजाचे प्रश्न माहिती आहेत. जालनामधील आंदोलन का चिघळले? मराठा समाजावर हल्ले पोलिसांनी का केले? यामध्ये राजकीय डाव तर नाही ना, मुंबईमध्ये 'इंडिया'ची बैठक सुरू होती. देशातील जनता बैठकीकडे लक्ष देऊन होती. प्रमुख नेते भाषण करत होते आणि ते सर्व माध्यमांमधून दाखवल जात होते. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी जालनामध्ये आंदोलनावर लाठीचार्ज करून गोंधळ निर्माण करण्यात आला.
लाठीचार्ज प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीमध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, सरकारच दोषी आहे तर कारवाई कोणावर करणार? - संजय राऊत, खासदार
सरकारने वातावरण चिघळून दिलं : मराठा समाजाचे आतापर्यंत अनेक मोर्चे निघाले. मराठा समाजाचे हे मोर्चे प्रथम निघालेले नाहीत. कधीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. जाणीवपूर्वक लाठी हल्ला करून महाराष्ट्रात तणाव निर्माण केला जात आहे. त्या तणावाच्या माध्यमातून मुंबईत चाललेल्या इंडिया बैठकीचे लक्ष सुनियोजितपणे हटवायचे. त्यासाठी केलेला हा लाठी हल्ला आहे. राज्य सरकारची अस्वस्थता बाहेर आली आहे. या मोर्चामध्ये तरुण, आबालवृद्ध होते. या सरकारने मोर्चाचं वातावरण चिघळून दिलं आणि हा लाठी हल्ला घडून आणला, असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी केले आहेत.
हे सरकारचे अपयश आहे : देशात आणि महराष्ट्रात दंगली घडवल्या जातील त्याचे हे प्रमाण आहे. निवडणुकीआधी या राज्यात आणि देशात दंगली घडवल्या जातील हे आम्ही आता देखील सांगत आहोत. हे सरकारचे अपयश आहे. सरकारला निवडणुकीआधी जात-पात यांच्यात दंगली घडवायच्या आहेत. हे सरकार कट कारस्थान करण्यामध्ये माहीर आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, एवढे हे प्रकरण गंभीर आहे. विरोधकांना तुरुंगात टाकायचे, भ्रष्टाचार करायचा, खोटे खटले टाकायचे आणि असे हल्ले करायचे, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
हेही वाचा -