मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येवून ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. या निवडणुकीत सर्वांचेच लक्ष कोकणातील खेड दापोली विधानसभा मतदारसंघाकडे लागले आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा झाली. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील खेडमध्ये सभा झाली. इथे दोन्ही गटांनी आपापला उमेदवार जाहीर केला. मात्र, या मतदारसंघात 60 टक्के मतदान असलेला कुणबी समाज मात्र नाराज आहे. कुणबी समाजाने त्यांच्या समाजाचा उमेदवाराची मागणी केली आहे. या संदर्भात आज मुंबई येथे एक मेळावा घेण्यात आला.
40 वर्षांचा कुणबी समाजाचा वनवास : या संदर्भात माध्यमांशी बोलताना कुणबी समाजाचे नेते आणि कुणबी समाजाचे संभाव्य उमेदवार संदीप राजपुरे म्हणाले की, कोकणात जवळपास 60 ते 65 टक्के मतदार हा कुणबी समाजाचा आहे. मात्र, मागची 40 ते 45 वर्ष या समाजाला त्यांचे नेतृत्व करणारा उमेदवार मिळालेला नाही. कोणत्याही पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी कुणबी समाजातील नेत्याला उमेदवारी दिलेली नाही. हा राग आमच्या कुणबी समाजामध्ये आहे. ही 40 वर्षाची खदखद आता कुठेतरी बाहेर पडत आहे. आजच्या मेळाव्यात आमचा हाच ठराव झाला आहे की, 40 वर्षाचा वनवास आता आपण संपवायचा आहे.
जो पक्ष उमेदवार देईल त्याच्या मागे समाज : पुढे बोलताना संदीप राजपुरे म्हणाले की, आजच्या मेळाव्यात आमचा ठराव झाला. जो पक्ष कुणबी समाजाला उमेदवारी देईल, त्या पक्षाच्या मागे कुणबी समाज ठामपणे उभा राहील. कुणबी समाजाला उमेदवार मिळावा, यासाठी आमच्या विविध पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका सुरू आहेत. मी स्वतः राष्ट्रवादीचा प्रदेश सरचिटणीस आहे. मी स्वतः आमचे नेते शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार यांच्याशी समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी संपर्क करत आहे. बोलत आहे. आमच्या समाजात इतर पक्षांचे देखील काही नेते आहेत. ते त्यांच्या पक्षाच्या संबंधित नेत्यांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे जो पक्ष कुणबी समाजाला येत्या निवडणुकीत विधानसभेत उमेदवारी देईल, त्या पक्षाच्या मागे कुणबी समाज ठामपणे उभा राहील.