मुंबई - निवडणुकीत प्रचारासाठी विविध माध्यमे वापरली जातात. नवनवीन संकल्पना आणल्या जातात. वेळ पडल्यास प्रचार सभा आणि रॅलीमध्ये अभिनेते आणि अभिनेत्रींना प्रचारासाठी आणले जाते. त्यात आता सोशल मीडियावरून व्हिडिओच्या माध्यमातून एखाद्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करण्याची भर पडली आहे. भायखळा येथील शिवसेना, भाजप, रिपाई युतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना निवडून देण्याचे आवाहन जॉनी लिव्हर, सोनम अरोरा या हिंदी आणि रमेश पाटकर मराठी कलाकारांनी केले आहे.
जॉनी लिव्हर हे यामिनी जाधव यांना ३० ते ३२ वर्षांपासून ओळखत आहेत. त्यांनी एका व्हिडिओद्वारे यामिनी जाधव यांना निवडून द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. भायखळा मतदारसंघाचा विकास आणि परिवर्तन करण्यासाठी यामिनी कार्यरत असल्याचंही ते म्हणाले.
सोनम अरोरानेही यामिनी जाधव यांना निवडून द्यावं, असं आवाहन केलं आहे. जितक्या महिला देशात पुढे येतील तितके चांगले आहे. मुंबई महाराष्ट्र आधीच सुरक्षित आहे. तरीही यामिनी जाधव निवडून आल्या तर मुंबईमधल्या महिला आणखी सुरक्षित होतील. यामुळे भायखळ्यामधील मतदारांनी त्यांना सहकार्य करून निवडून आणावे, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -Video: 'तो' करतो मिमिक्रीतून मतदानाचे आवाहन
मराठी तसेच हिंदी अभिनेते रमेश पाटकर यांनीदेखील यामिनी जाधव यांना निवडून द्यावं, असं आवाहन केलं आहे. यामिनी जाधव यांचं कुटुंब जनतेसाठी काम करणारं आहे. सामान्यांच्या मदतीसाठी वेळोवेळी धावून जाणारी, मदत करणारी आपली शिवसेना आहेच. यामुळे यामिनी जाधव यांना मतदान करा, असे आवाहन त्यांनी केलं आहे.
हेही वाचा -बेलापूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक गावडे यांच्या प्रचार रॅलीत 'लागीर झालं जी'च्या कलाकारांचा सहभाग