मुंबई Jayant Patil On NCP Hearing : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाविरोधात बंड करून शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह चिन्हावर सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. काल केंद्रीय निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीवरून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर काल सुनावणी झाली. सुनावणीवेळी दोन्ही गटातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. अजित पवार गटानं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांवर शरद पवार गटाच्या वकिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
डिलिव्हरी बॉय, गृहिणीची शपथपत्रं : याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आमचे सर्व मुद्दे कागदावर आहेत. मात्र, विरोधी गटानं दहा वर्षांची मुलं, झोमॅटो डिलिव्हरी बॉय, गृहिणी यांची शपथपत्रं तयार केली आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एका जिल्ह्यातील 32 जिल्हाध्यक्षांचे प्रतिज्ञापत्र देण्यात आलं आहे. ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही. त्यांना प्रतिज्ञापत्र कशासाठी देत आहोत, हे माहीत नाही. याची दखल केंद्रीय निवडणूक आयोग घेईल, असा आम्हाला विश्वास असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
पक्ष कुणाच्याही मागं जात नाही : सर्वोच्च न्यायालयानं शिवसेना पक्षाबाबत निर्णय दिला आहे. बहुसंख्य आमदार गेले तरी, त्यांच्यासोबत पक्ष जात नाही. बहुसंख्य कार्यकर्ते कुणाकडं आहेत, यावर पक्ष अवलंबून असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडं दुर्लक्ष करून 'ते' निर्णय देतील असं मला वाटत नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.
आरक्षणाबाबत योग्य निर्णय घ्या : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमधील काही लोक मराठा-ओबीसींना डिवचत आहेत. दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं सरकारनं योग्य तो निर्णय घ्यावा, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं. तसेच राष्ट्रवादीला कोणाच्याही भावना दुखावायच्या नाहीत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा, ओबीसी, धनगर, आरक्षणाबाबत बोलावं अशी मागणी देखील जयंत पाटील यांनी केलीय.
राज्यात बेरोजगारी वाढली : गुंतवणुकीच्या क्षेत्रात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर गेला आहे. सरकार फक्त इव्हेंट करण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडं वेळ नाहीय. राज्यातीलच उद्योग इथर राज्यात पळवले जात आहे. राज्यात बेरोजगारीचा दर आता 10.9 टक्के झाल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -
- Sharad Pawar : शरद पवार, अजित पवारांची पुण्यात भेट, भेटीनंतर अजित पवार दिल्लीला रवाना
- Maratha Reservation Protest : शरद पवारचं मराठा आरक्षणाचे हिटलर - आरक्षण अभ्यासक नामदेव जाधवांचा हल्लाबोल
- Historical School In Mumbai : मुंबापुरीत 132 वर्षापासून सुरू आहे ऐतिहासिक शाळा; अभिनेता स्वप्निल जोशीनंही घेतलं शिक्षण, जाणून घ्या शाळेचा इतिहास